Nashik Crime News : सटाणा शहरात गांजा विक्री करणार्‍या दोघा तरुणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A special team of Inspector-in-Charge Kiran Patil and Superintendent of Police Shahaji Umap arrested youths selling ganja in the city.

Nashik Crime News : सटाणा शहरात गांजा विक्री करणार्‍या दोघा तरुणांना अटक

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शहरातील दोन तरुणांकडे तब्बल तीन लाख रुपयांचा ८ किलो गांजा आणि रोख रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी दोघा तरुणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सटाणा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. (Two youths arrested for selling ganja in Satana city Nashik Crime News)

A stash of ganja and cash seized from the house.

A stash of ganja and cash seized from the house.

याबाबतचे वृत्त असे सटाणा शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती सटाणा पोलीस व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यांनी शहरातील भाक्षी रोडच्या समर्थ नगरमधील मंगेश धर्मा बगडाणे व मंगल नगर येथील अजय उर्फ शिवा सीताराम चौरे यांच्या घरात छापा टाकला असता दोन्ही ठिकाणाहून अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे प्रत्येकी ४ किलो असा एकूण ८ किलो गांजा जप्त केला.

या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून शहरातील बड्या घरांमधील तरुणांचा या गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. सटाणा शहरातील अनेक युवक गांज्याच्या आहारी गेले असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर शहरातील गांजा प्रकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असुन रात्री उशिरा याबाबत सटाणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना सटाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची ५ दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, गोपनीय शाखेचे अशोक चौरे, हरि शिंदे, अजय महाजन, जिभाऊ पवार, योगेश साळुंखे, रवि शिंदे, दत्ता आहेर, धनंजय बैरागी, विशेष पथकातील चांदवडचे पोलीस निरीक्षक समिर बारावरकर, उपनिरीक्षक पवन सुपनर यांच्यासह सहकाऱ्यांनी आदिंनी सहभाग घेतला होता.

गेल्या आठवड्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी लखमापुर (ता.बागलाण) येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मटकाच्या अड्ड्यावर कारवाई केली होती. तसेच शहरातील वेगवेगळ्या हॉटेलवर छापा मारत अवैधरित्या विक्री होणार्‍या देशी-विदेशी दारूचे धंदे उद्ध्वस्त केले होते.

अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या वाहनांवरही जप्तीची कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी अवैध धंद्यांना टार्गेट करत कारवाईचा धडाका लावल्याने सर्वसामान्य जनतेने या कारवाईचे स्वागत केले असून अशा कारवाया सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.