
नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना पेशंटवर उपचार करताना अव्वाच्या सव्वा बिले आकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर वॉच ठेवण्यासाठी सहा विभागात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत कोरोना उपचाराची बिले तपासली जात आहेत. बिलासंदर्भात तक्रारी वाढतचं राहिल्यास रुग्णालयांमध्ये इन्कम टॅक्स ऑफीसर बसवावे लागेल असा कडक ईशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला.
हॉस्पिटलवर सुक्ष्म नजर ठेवली जाणार
माध्यमांच्या वेबिनार मध्ये आयुक्त गमे यांनी स्पष्टीकरण दिले. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतं असून आता महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये देखील रुग्ण भरती होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतू कोरोना पेशन्ट बरा झाल्यानंतर त्याच्या हातात टेकवल्या जाणाऱ्या बिलामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दहा ते पंधरा दिवसांचे पाच-सहा लाख बिले आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात "सकाळ' ने रुग्णालयांची दुकानदारी या वृत्ताच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या लुटीचा लेखाजोखा मांडला. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त गमे यांनी अतिरिक्त बिलांना आळा घालण्यासाठी घेतलेले निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, लुट रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकदा रुग्ण बरा होऊन बाहेर पडल्यानंतर तक्रार करत नाही अशी मानसिकता आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयातून पथकामार्फत पाच, सहा बिले घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. विशेष करून कार्पोरेट हॉस्पिटलवर सुक्ष्म नजर ठेवली जाणार असून त्यानंतरही तक्रारी कमी न झाल्यास मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक रुग्णालयात इन्कम टॅक्स ऑफीसर नियुक्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
म्हणून रुग्णालये फुल्ल
वडाळा गाव, जुने नाशिक, फुले नगर, सातपूर भागात अधिक रुग्ण आढळतं असले तरी त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर घरी सोडले जात नाही. घरी सोडले तर घरातही जागा नसल्याने ते बाहेर फिरतील व इतरांना लागण होईल त्यामुळे हा उपाय योजल्याने रुग्णालयांमधील बेड फुल्ल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात कोरोनाने 81 जणांचा मृत्यु झाला असून मृत्युची कारणे शोधून मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष योजना आखली जाणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरती होताना खरोखरचं उपचाराची गरज आहे का? याचा विचार करून भरती व्हावे जेणे करून अति जोखमीच्या रुग्णांना भरती करता येईल असे आवाहन देखील आयुक्त गमे यांनी केले.
आयुक्त म्हणाले...
- महापालिकेच्या वेबसाईटवर डॅशबोर्डद्वारे कोरोनाची सविस्तर माहिती.
- रुग्ण संख्या 1600 असली तरी ऍक्टीव्ह रुग्ण 900.
- रंगारवाडा, फुले नगर, वडाळा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती.
- सोमवार पासून महापालिकेच्या ऍप द्वारे रुग्ण, रुग्णालयांची माहिती.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांपेक्षा शहरात स्वॅब चाचणीचे प्रमाण अधिक.
- ठक्कर डोम आठ दिवसात कार्यान्वित होणार.
- शासनाच्या नव्या सुचनांनुसार 100 टक्के विलगिकरण आता घरांमध्ये.
- व्हॉईस मेसेज द्वारे कोरोनाची भिती दुर करणार.
- महापालिकेची 6500 खाटांची तयारी.
मास्क विक्रीवर बंदी
कोरोना मुळे मास्कला मागणी वाढली असून शहरात सिग्नल, बाजारपेठां मध्ये विविध प्रकारचे मास्क विक्रिला आले आहे. परंतू कुठल्या प्रकारचा मास्क वापरावा संदर्भात देखील नियमावली आहे. ठराविक लेयरचे व गुणवत्ता असेल तरचं मास्क विकता येणार असल्याने शहरात जागोजागी सुरु असलेली मास्क विक्री थांबविली जाणार असल्याचे आयुक्त गमे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.