esakal | शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मिळणार वयानुरूप प्रवेश

बोलून बातमी शोधा

school
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मिळणार वयानुरूप प्रवेश
sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : राज्याच्या शिक्षण विभागाने १ ते १० मार्च या कालावधीत राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेतून सहा ते १४ वयोगटांतील २५ हजार २०४ मुले शाळाबाह्य आढळून आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात शाळाबाह्य मुलांना वयानुरूप प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामावून घेतले जाणार आहे.

विशेष शोधमोहीम

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा कुलूपबंद आहेत. त्यामुळे तंत्रस्नेही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवले आहे. कोरोनामुळे शिक्षणप्रक्रिया विस्कळित झाल्याने अनेक मुले शाळाबाह्य झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविली. क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अनेक अडचणींचा सामना करत ही मोहीम पूर्ण केली. औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत, तर पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिका क्षेत्रात तांत्रिक अडचणीमुळे सदर मोहीम राबविण्यात आली नाही.

अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य

दरम्यान, २५ हजार शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी सात हजार ८०६ मुले कधीच शाळेत गेलेली नाहीत, तर १७ हजार ३९७ मुले अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मोहिमेनंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेली सांख्यिकी मागवण्यात आली. या शोधमोहिमेचा अहवाल प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्य शासनाला नुकताच सादर केला आहे.

पाल्याला नियमित शाळेत पाठविण्यास तयार

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेतील आकडेवारीनुसार मुंबई उपनगरात सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी असल्याची नोंद आहे. त्यानंतर पालघर, पुणे, नंदुरबार, अकोला, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे पहिली ते पाचवीचे ४५ लाख ६७ हजार १४४, तर सहावी ते आठवीचे १५ लाख ४७ हजार १७५, नववी ते बारावीचे १३ लाख १५ हजार ८६५ विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. कोरोनानंतर ८३ लाख २२ हजार ९९० पालक आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय शाळाबाह्य विद्यार्थी असे :

* मुंबई उपनगर : दहा हजार १७७

* मुंबई : ६४४

* ठाणे : ३२३

* रायगड : ६५

* पालघर : दोन हजार २८५

* पुणे : तीन हजार २७८

* सोलापूर : २४९

* नगर : ४६३

* कोल्हापूर : १०१

* सातारा : १८४

* सांगली : १२८

* रत्नागिरी : ८९

* सिंधुदुर्ग : १५२

* नाशिक : एक हजार ८६७

* धुळे : १७०

* नंदुरबार : एक हजार ३१६

* जळगाव : ७१८

* जालना : ७१

* बीड : ३२२

* परभणी : ११९

* हिंगोली : १०१

* लातूर : ३२

* उस्मानाबाद : ३९

* नांदेड : १६०

* अकोला : एक हजार ६४

* वाशीम : १३

* यवतमाळ : १६७

* नागपूर : २३९

* भंडारा : १९

* गोंदिया : ८८

* चंद्रपूर : १०७

* गडचिरोली : २७७

* वर्धा : १७७

''पालकांचे स्थलांतर, अज्ञान, कौटुंबिक परिस्थिती, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्यांना शाळेत दाखल करून घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विद्या प्राधिकरणाने तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण ‘शिक्षक मित्र’ पुस्तकाच्या आधारे दिले जाईल''. -विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, पुणे