शरण्या शेट्टी यांना आउटस्टँडिंग सिटीझन ऑफ नाशिक पुरस्कार

Outstanding Citizen Award
Outstanding Citizen Award

नाशिक : नाशिक सिटीझन फोरमतर्फे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी दिला जाणारा आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक पुरस्कार ‘शरण फॉर ॲनिमल’च्या शरण्या शेट्टी यांना जाहीर झाला आहे. हा पहिलाच पुरस्कार असून, दरमहा एका व्यक्तीला पुरस्कार दिला जाणार आहे.

अनाथ प्राण्यांसाठी गेल्या १५ वर्षांपासून शरण्या शेट्टी काम करीत आहेत. २००५ मध्ये शरण फॉर ॲनिमल संस्थेची त्यांनी स्थापना केली. रस्त्यावरील श्वानांसाठी मदतकार्य करणाऱ्या संस्थेचा व्याप वाढविताना अनेक प्रकारच्या प्राण्यांना सहारा दिला. संकटातून सुटका, उपचार व निवारा या तीन स्तरांवर शरण संस्था प्रामुख्याने काम करते. दीड हजारांपेक्षा अधिक प्राणी-पक्ष्यांची संकटातून सुटका केली असून, सध्या सुमारे दोनशे प्राण्यांना निवारा दिला आहे.

विल्होळी येथील कचरा डेपोसमोरच्या जागेत शरणचे निवारागृह असून, तिथे जखमी व आजारी प्राण्यांची सुश्रृषा केली जाते. या ठिकाणी प्राण्यांची वैद्यकीय तपासणी, उपचार केले जातात. बरे झालेल्या प्राण्यांच्या पुनर्वसनाचे कामही संस्थेमार्फत केले जाते.

उमेद वाढविण्यासाठी पुरस्कार : राठी

नाशिकच्या सुनियोजित प्रगतीसाठी नाशिक सिटीझन्स फोरम विविध माध्यमातून प्रयत्नशील असते. औद्योगिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच नाशिकच्या नागरिकांचा एकंदरीतच जीवनस्तर उंचाविण्याच्या हेतूने फोरम काम करीत असते. त्यासाठी स्वच्छता, सुरक्षितता, शिस्त, शिक्षण, कौशल्य विकास, पर्यावरण, सौंदर्यीकरण आदी नागरी विषयांबाबत सहमती घडवून आणणे आणि त्याबाबतच्या कामांना चालना देण्याचा फोरमचा उद्देश आहे. मात्र, या विषयांमध्ये संस्थात्मक कामांप्रमाणेच वैयक्तिक स्तरावरील योगदानाचेही मोल मोठे असते.

कुणी संस्था उभारून तर कुणी एकांड्या शिलेदाराप्रमाणे धडपड करीत असतो. कधी या प्रयत्नांची दखल घेतली जाते तर कधी नाही, म्हणूनच अशा लोकांना गौरविणे, त्यांची उमेद वाढविणे आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरीत करणे या उद्देश्याने ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ची सुरवात करीत असल्याचे नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष हेमंत राठी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com