Nashik | इगतपुरी तालुक्यात साठ टक्के भात उत्पादनावर पाणी; शेतकरी बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paddy cultivation in Igatpuri taluka has been severely damaged due to unseasonal rains

इगतपुरी तालुक्यात साठ टक्के भात उत्पादनावर पाणी; शेतकरी बेजार

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून या बदललेल्या हवामानामुळे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या बेमोसमी पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळीत आणि आता झालेल्या पावसाने तालुक्यातील साठ टक्क्यावर भाताचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र अजून ना पंचनामे पूर्ण झाले, ना विमा कंपन्यांनी पाहणी केली. जिल्हा प्रशासनानेही याबाबत वेगाने कार्यवाही न केल्याने आपल्याला वालीच उरला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय नेतेही या गंभीर प्रश्नांकडे पाहायला तयार नसल्याने तर शेतकरी अधिकच संतापले आहेत.

पूर्व भागातील टाकेद, अडसरे, धामणगाव, भरविर, अधरवड, खेड, इंदोरे, वासाळी, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, वासाळी, बारशिगवे, सोनोशी, धानोशी, निनावी, मायदरा, दौंडत, उभाडे, उंबरकोन, देवळे, खैरगाव आदी गावांसह वाड्या वस्त्यांमध्ये बेमोसमी पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या भात शेतीत पाणी साचल्याने उभे असलेले, कापून ठेवलेले, सोंगणी करून खळ्यावर ठेवलेले धान पूर्णतः भीजले आहे.

भिजल्याने गुणवत्तेवर परिणाम

पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व ढगाळ वातावरणामुळे शेतातील पाणी कमी होत नाही. या कारणास्तव हातातोंडाशी आलेले पीके शेतकऱ्यांना काढता येत नाही. खाचरात पाणी साचल्याने मळणी यंत्र, ट्रॅक्टरसह शेतकी अवजारे, यंत्र देखील शेतात घेऊन जाता येत नाही. मजूरदेखील कामाला येत नसल्याने भाताचे पूर्णपणे नुकसान होत आहे. या भाताला वाचवायचे तरी कसे हा प्रश्न आहे. अनेकांचा खळ्यावर साचवून ठेवलेला भात भिजल्याने भाताची गुणवत्ता घसरणार आहे. अशा भाताला हमीभाव, बाजारभाव तरी मिळणार का या प्रश्नाने शेतकरी बेजार झाला आहे.

हेही वाचा: नाशिक | आता तरी होणार का सिडकोचा महापौर? सिडकोवासीयांना शल्य

भरपाई कधी मिळणार?

महसूल प्रशासन, विमा कंपनी अधिकारी वर्गाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत. पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. गतवर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यातच यंदाही पावसाने नुकसान झाल्याने यंदा तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का ? असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधीनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी व भरपाईसाठी प्रयत्न करावेत. उसनवारीची परतफेड कशी करावी असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.

भरपाई त्वरित मिळावी

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसमोर आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, अनिल वाजे, ज्ञानेश्वर कोकणे, शेतकरी नेते उत्तम शिंदे, सागर गावंडे, नामदेव शिंदे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा: टीईटी परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त

loading image
go to top