
रंगकाम करणारे चोरटे गजाआड
नाशिक : चांडक सर्कल येथील गौरव बंगल्यात ठेकेदार पद्धतीतून रंगकाम करणाऱ्या कामगारांनी रोकड व सोन्याचे दागिने चोरल्याची घटना गेल्या १४ मे स घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सूत्रे हलविताना या घटनेतील संशयित संजय यादव याला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. त्याच्याकडून साडेसहा लाखांची रोकड व मोबाईल हस्तगत केला आहे. संशयित संजय यादव यास न्यायालयात हजर केले असता, मंगळवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.( Painter arrested due to stoaling cash and gold jewelery in nashik)
चांडक सर्कल परीसरातील गौरव बंगल्याच्या रंगकामाला बोलावलेल्या परप्रांतीय कारागिरांनी रोकड व दागिन्यांसह २३ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गौरव अतुल चांडक यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. संशयित संजय यादव (२८, रा. नरोरा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश), साहिल मकसूद अहमद मन्सूरी (२७, गुठैय्या, बकेवर, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२७ मार्च ते ४ एप्रिल कालावधीत दोघा संशयितांनी बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम करताना बंगल्यातील तीनशे ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, साडेआठ लाख रुपये रोकड, असा २३ लाख ५० हजारांचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत म्हटले होते. याप्रकरणी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची उकल केली आहे.
हेही वाचा: नाशिक : रंगकाम करणाऱ्यांनीच दागिन्यांवर मारला डल्ला
मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक के. टी. रोंदळे व गुन्हे शोध पथकाचे हवालदार आर. व्ही. सोनार, अंमलदार अप्पा पानवळ, अनिल अव्हाड, समीर शेख यांचे पथक उत्तर प्रदेशला पाठविले होते. या पथकाकडून संशयित संजय यादव याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून साडेसहा लाख रुपये रोख व मोबाईल हस्तगत केला आहे. साथीदार साहिल मकसूद मन्सूरी याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली संशयित संजय यादवने दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा: कोल्हापूर : साडेतीन तोळ्यांचे दागिन्यांची चोरी
Web Title: Painter Arrested Due To Stoaling Cash And Gold Jewelery In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..