Palase Bus Accident Case : ‘त्या’ बसचे ब्रेक फेल नव्हते! बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

palase bus accident news

Palase Bus Accident Case : ‘त्या’ बसचे ब्रेक फेल नव्हते! बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

नाशिक : नाशिक-पुणा महामार्गावर गेल्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातातील परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल नसल्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाच्या तांत्रिक निरीक्षकांनी न्यायालयास दिल्याचे समोर आले. याच कारणावरून न्यायालयाने बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या अपघातामध्ये बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा आगीत होरपळून बळी गेला होता. (Palase Bus Accident Case brakes of bus not failed Bail application of bus driver rejected nashik news)

राजेंद्र अंबादास उईके (रा. राजगुरुनगर, जि. पुणे) असे बसचालकाचे नाव आहे. नाशिक-पुणा रोडवरील पळसे चौफुलीवर गेल्या ८ तारखेला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात येणार्या खेड डेपोच्या बसवरील (एमएच ०७ सी ७०८१) चालक उईके यांचे नियंत्रण सुटले आणि बसने गतीरोधकावर क्रेटा कारला धडक दिल्यानंतर तीन दुचाक्यांना उडविले.

तसेच, पुढील बसला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. यावेळी एका दुचाकीवरील दोघे बसच्या चाकाखाली सापडले. त्याचवेळी दुचाक्यांनी पेट घेतला. या आगीत बसखाली अडकलेल्या दोघांचा होरपळून मृत्यु झाला होता. तर, चौघे गंभीररित्या जखमी असून, २५ प्रवासी जखमी झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात बसचालकांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : 2 महिन्यातच सरपंचासह सदस्यांचे राजीनामे! कारण अद्याप गुलदस्त्यात!

दरम्यान, अपघातावेळी बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात होते. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) मोटारवाहन तांत्रिक निरीक्षकांनी बसची तपासणी करून एक अहवाल न्यायालयात सादर केला. त्या अहवालानुसार अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झालेच नव्हते, असे समोर आले आहे. दरम्यान, बसचालक उईके यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता, त्यावर आज सुनावणी झाली.

त्यावेळी सदरची बाब जिल्हा व सत्र न्यायधीश आर. आर. राठी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायधीशांनी बसचालक उईके यांच्या बेजबाबदारपणामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला असून, गुन्हा गंभीर असल्याचे मत नोंदविले आणि उईके यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे यांनी युक्तिवाद करीत बाजू मांडली.

हेही वाचा: Gram Panchayat Election : गोळवाडला 25 वर्षांनंतर निवडणूक; बिनविरोधची परंपरा खंडीत!