पंचवटी एक्स्प्रेस : नाशिककरांच्या आयुष्याचा अविभाज्य प्रवास!

पंचवटी एक्स्प्रेस : नाशिककरांच्या आयुष्याचा अविभाज्य प्रवास!
Published on: 
नाशिककरांच्या आपुलकीच्या नात्याची ५० वर्षे! पंचवटी एक्स्प्रेसची यशस्वी वाटचाल; ५१ व्या वर्षांत पदार्पण अंबादास शिंदे : सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. ३१ :सकाळची लगबग, नाशिक रोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची धावपळ, हातात डबा आणि खांद्यावर कार्यालयीन बॅग घेऊन गाडीची वाट पाहणारे नोकरदार, पंचवटी एक्स्प्रेसचा भोंगा वाजला की अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. मुंबईत नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही केवळ रेल्वेगाडी नाही, तर त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी सुरू झालेल्या पंचवटी एक्स्प्रेसने ५१ वर्षांच्या प्रवासात अनेक पिढ्यांना मुंबईशी जोडले आहे. पन्नास वर्षांचा टप्पा पूर्ण करून ही गाडी आता सुवर्णमहोत्सवानंतरच्या वाटचालीत पुढे जात आहे. १९७० च्या दशकात नाशिक आणि मुंबईदरम्यान नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत होती. या प्रवाशांना वेळेत मुंबई गाठता यावी, या गरजेतून मध्य रेल्वेने पंचवटी एक्स्प्रेस सुरू केली. १ नोव्हेंबर १९७५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत या गाडीचे उद्‌घाटन झाले होते. सुरुवातीच्या काळापासून बदलत्या तंत्रज्ञानासोबत या गाडीनेही कात टाकली. वाफेच्या आणि डिझेल इंजिनांच्या काळापासून विद्युत इंजिनांच्या युगापर्यंत भारतीय रेल्वेने मोठा प्रवास केला. पंचवटी एक्स्प्रेसही या बदलांची साक्षीदार ठरली. जुन्या डब्यांपासून आधुनिक एलएचबी डब्यांपर्यंत झालेला प्रवास, वातानुकूलित चेअरकारची सुविधा आणि डब्यांच्या रचनेतील बदल यामुळे तिचे स्वरूप बदलत गेले. २०१८ मध्ये या गाडीला नव्या स्वरूपातील डबे जोडण्यात आले होते. -- तीन दशकांच्या प्रवासात जपलेले नाते मुंबईत नोकरी करायची, मात्र कुटुंबासह नाशिकमध्ये राहायचे, असा पर्याय अनेकांनी स्वीकारला. दररोज अप-डाऊन करणे अनेक नोकरदारांसाठी सोयीचे ठरले. काहींनी दशकानुदशके हा प्रवास केला. एका नोकरदाराने तब्बल ३३ वर्षे पंचवटी एक्स्प्रेसने ये-जा केल्याची आठवण या गाडीशी जोडलेल्या प्रवाशांच्या दीर्घ प्रवासाची साक्ष देते. या प्रवासात केवळ सहप्रवासी भेटले नाहीत, तर अनेकांना जिवाभावाचे मित्र मिळाले. रोज एकाच डब्यात, एकाच वेळी भेटणाऱ्या प्रवाशांमध्ये हळूहळू कौटुंबिक नाते निर्माण झाले. अशा अनेक आठवणींमुळे पंचवटी एक्स्प्रेस प्रवाशांसाठी केवळ प्रवासाचे साधन न राहता आपुलकीचे व्यासपीठ बनली आहे. --- ‘आदर्श कोच’मुळे वेगळी ओळख पंचवटी एक्स्प्रेसच्या इतिहासातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली ‘आदर्श कोच’ संकल्पना. गाडी स्वच्छ ठेवणे, शिस्त पाळणे आणि सहप्रवाशांप्रति जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा त्यामागील उद्देश होता. या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही घेण्यात आली. प्रवाशांच्या सहभागातून रेल्वेगाडीला अधिक चांगले स्वरूप देता येते, याचे हे उदाहरण ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.