Latest Marathi News | रामकुंड नव्हे... रामतीर्थ!; पांडव लेण्यांतील शिलालेखात ‘रामतीर्थ’ असा उल्लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shantaramashastri Bhanose

Nashik : रामकुंड नव्हे... रामतीर्थ!; पांडव लेण्यांतील शिलालेखात ‘रामतीर्थ’ असा उल्लेख

नाशिक : येथील सुंदरनारायण मंदिर ते मोदकेश्वरापर्यंत दक्षिणवाहिनी झालेल्या गोदावरीच्या क्षेत्राचा प्राचीन ग्रंथांमध्ये आणि संत वाङ्‌मयात ‘रामतीर्थ’ असा उल्लेख करण्यात आला आहे. इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकात पांडव (त्रिरश्‍मी) लेण्यांमधील एका लेणीतील शिलालेखात ‘रामतीर्थ’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. वैदिक संस्कृतीचे अभ्यासक स्मार्त चूडामणि पंडित शांतारामशास्त्री भानोसे यांनी ही माहिती दिली.

पांडव (त्रिरश्मी) लेण्यांमधील क्रमांक १० च्या लेणीमध्ये हा शिलालेख आहे. तो दुसऱ्या शतकात कोरलेला असून, त्या वेळी नाशिकक्षेत्री क्षत्रपांचे राज्य होते. शालिवाहन शके ४० मध्ये वैशाख महिन्यात सिंहस्थ पर्व होते. त्या वेळी राजाने दानादि कर्म करून हा शिलालेख कोरून घेतला. राजा नहपान, त्यांची मुलगी दक्षमित्रा आणि जावई उषवदत्त यांनी मिळून दानधर्म केले, असा उल्लेख शिलालेखावर आहे. ‘रामतीर्थ’ असा उल्लेख आल्याने नाशिक, पंचवटी, गोदावरी हे अभिप्रेत आहे, असे श्री. भानोसे यांनी सांगितले. (pandavleni caves inscription mentions Ramatirtha Nashik Latest Marathi News)

रामतीर्थावर दान

प्रपाकरेण पींडितकावडे गोवर्धने सुवर्णमुखे शोपरिगेच रामतीर्थें

चरकपर्षभ्दयः ग्रामे नानंगोले द्वात्रिंशतनाळीगेरमूलसहस्त्रप्रदेन गोवर्धने

त्रिरश्‍मिषु पर्वतेषु धर्मात्मना इदं लेणं कारितं इमा च पीढियो

भटारका-अंजातिया च गतोस्मिं वर्षारतुं मालयेहि रुधं उत्तमभाद्रं मोचयितुं

राजा नहपानाचा हा शिलालेख ब्राह्मी लिपित, संस्कृत भाषेत आणि प्राकृतातील आहे. त्याचा मराठी अनुवाद असा : राजा नहपान, जावई उषवदत्त आणि मुलगी दक्षमित्रा यांनी गोवर्धन, सुवर्णमुख, शुर्पारक आणि ‘रामतीर्थ’ या ठिकाणच्या संन्याशांना आणि ब्राह्मणांना सुवर्णासह गायी दान केल्या व व्यवस्था लावली. चारही बाजूने ऐसपैस निवासस्थाने बांधून दिली. तलाव, विहिरी, उद्याने लोकोपयोगी निर्माण केल्या. दोन्ही तीरांवर धर्मशाळा बंधल्या. पाणपोई सुरू केल्या. वर्षभर ब्राह्मण भोजन केले.

‘रामतीर्थ’ असा स्पष्ट उल्लेख असलेल्या या शिलालेखाचा अभ्यास इतिहास आणि भारतीय संस्कृती तसेच पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. वा. वि. मिराशी आणि नाशिकचे इतिहास संशोधक प्रा. रंगनाथ गायधनी यांनी केला आहे. या संदर्भातील ‘नाशिक-त्र्यंबक : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथादर्शन’, ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ हे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर या शिलालेखाचा अभ्यास नाशिकमधील हस्तलिखित जतनकार आणि भारतीय विद्या अभ्यासक अनिता जोशी यांनी केला आहे.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी तिने Air Indiaच्या नोकरीवर सोडलं पाणी..

अनिता जोशी यांनी संस्कृत आणि भारतीय विद्याविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, त्यांनी प्राचीन दस्तऐवजचे प्रशिक्षण घेतले आहे. २००५ पासून त्या भांडारकर इन्स्टिट्यूटशी संलग्न आहेत. नाशिक, नगर, सोलापूर येथील दस्तऐवजी नोंदणी आणि जतनाचे काम त्यांनी केले आहे. ३० हजार ग्रंथ शोधून त्यांची नोंदणी केली आहे. त्यांनी नाशिकमधील वाड्यांमधील भित्तिचित्रे शोधली आहेत. त्याचे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.

"राजा नहपानाच्या दानधर्माबाबत आपणाला माहिती मिळते. तो शिलालेख ज्या वर्षी कोरला गेला, त्याच्या एक वर्ष अगोदर गोदावरीक्षेत्री रामतीर्थावर सिंहस्थ कुंभमेळा पर्व होते. त्याचा कालखंड इसवी सन ८ एप्रिल ११८ ते ३ ऑगस्ट ११८ असा होता. कालयुक्त नाम संवत्सरे, वैशाख शुद्ध प्रतिपदा ते श्रावण वद्य अमावास्या या काळात हे दानधर्मादि कर्म झाले."

- पंडित गौरव देशपांडे, सूर्यसिद्धांतीय पंचांगकर्ते, पुणे

"अश्‍वयुगापासूनचा नाशिकचा इतिहास आहे. शिलालेखावरून राजकीय, सांस्कृतिक इतिहास समजतो. व्यापारी श्रेणींची दाने समजतात. नाशिकच्या पांडवलेण्यांमध्ये २४ शिलालेख आहेत. त्याच्याआधारे सातवाहन आणि पश्‍चिमी क्षत्रप अशी दोन राजसत्तांची माहिती मिळते. ‘रामतीर्थ’चा उल्लेख आढळणारा शिलालेख दहाव्या लेण्यातील व्हरांड्याच्या मागील भिंतीवर छताच्या खाली पाच ओळीत कोरलेला आहे."

- अनिता जोशी (हस्तलिखित जतनकार आणि भारतीय विद्या अभ्यासक, नाशिक)

हेही वाचा: SAKAL Special : युवक 'EMI'च्‍या चक्रव्यूहामध्ये!

टॅग्स :NashikGodavari River