गतीशक्तीच्या बदलात Passenger झाली इतिहासजमा; नांदगावसह सर्वत्र सध्या ‘वंदे भारत’चा बोलबाला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat Train

गतीशक्तीच्या बदलात Passenger झाली इतिहासजमा; नांदगावसह सर्वत्र सध्या ‘वंदे भारत’चा बोलबाला!

नांदगाव (जि. नाशिक) : लहान लहान स्थानकांवर थांबणारी पॅसेंजर म्हणजेच रेल्वेच्या भाषेतील सवारी गाडी विस्मरणात जाऊन तिची जागा आता मेमू नावाच्या कमी डब्यांच्या गाडीने घेतली आहे. कोरोना येण्याचे निमित्त झाले अन्‌ सर्वसामान्य जनतेला आपल्या कवेत घेणारी पॅसेंजर आता लोकही विसरून गेले.

आता रेल्वेच्या गतीशक्तीला प्राधान्य मिळाल्याने वातानुकूलित ‘वंदे भारत’चा सध्या बोलबाला आहे. (Passenger train became history Vande Bharat dominates everywhere including Nandgaon nashik news)

वेगवान प्रवास करण्याची कल्पना छान असली, तरी छोट्याछोट्या स्थानकावरून कधी काळी थंबणाऱ्या पॅसेंजर एवढी लोकप्रियता या नव्या गाड्यांना अजून तरी मिळणे बाकी आहे. भुसावळ ते मुबंई पॅसेंजरची जागा भुसावळ-देवळालीने घेतली आहे. अर्थात्‌ या गाडीला सर्वच ठिकाणी थांबे असणारी ती एकमेव गाडी आहे.

जिच्याने एक तर मनमाड, नाशिक येथे उतरून नंतर दुसरी गाडी पकडणे आलेच. त्यामुळे ग्रामीण जनतेची कनेक्टिव्हीटी मात्र खंडित झाली आहे. लहान लहान गावांतून मोठी शहरे गाठण्यासाठी अतिरिक्त पदरमोड करावी लागत असली, तरी पर्यायच शिल्लक नसल्यामुळे अनेक गावे व तेथील स्थानके शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.

खेड्यात खरा भारत अशी मूळ धारणा मागे पडून अतिशक्तीत गावे मात्र दुर्लक्षित झाल्याबद्दल गावनिहाय पुढारपण करणाऱ्यांनीदेखील बदलत्या स्वरूपात रेल्वेच्या नव्या बदलांतील या उणिवेकडे लक्ष वेधले नसल्याची खंतदेखील आहेच. पूर्वी पॅसेंजर गाडीला असणाऱ्या डब्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Jindal Accident : जिंदाल कंपनी दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित!

त्यातच अचानक कोरोना आला अन्‌ गावगाड्याच्या पॅसेंजरची शान गायब झाली. बर्थसह प्रसाधन गृहाचीही सुविधा असलेले डबे गेले अन्‌ डेमू आली असली, तरी जे सुख कमी व परवडणाऱ्या पैशात पॅसेंजरच्या प्रवासात मिळत होते, ते आताच्या मेमूच्या प्रवासात नाही.

शिवाय मोजक्या स्थानकांवर थांबणाऱ्या मेमूचे तिकीट एक्स्प्रेसच्या भावातले असल्याने किमान एसटीपेक्षा बरे असे मानून समाधानात वावरत पुढचा प्रवास करण्याखेरीज गत्यंतर नाही. पर्यायच शिल्लक नसल्याने स्वीकारण्यात आलेली तडजोड अशा धाटणीचा हा प्रवास आहे.

खडे बोल सुनावण्याची गरज

भुसावळ ते मुंबई दरम्यान कधीकाळी महत्वाचे स्थानक असलेल्या नांदगाव स्टेशनची झालेली परवड अजूनही थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. पूर्वीच्या वेळापत्रकात असलेल्या बहुतांश थांबणाऱ्या गाड्यांपैकी काही गाड्यांना येथे थांबा मिळाला असला, तरी अजूनही काही गाड्यांचे काढून घेण्यात आलेले थांबे परत मिळू शकलेले नाही.

कोरोना संपला की पूर्ववत सगळं ठीक होईल, अशी सारवासारव तेव्हा करण्यात आली होती. मात्र अजूनही कोरोना नांदगाव स्थानकावर मुक्कामाला आहे की काय, अशा समजुतीत वावरणाऱ्या रेल्वे प्रशासनाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांनी खडे बोल सुनावण्याची गरज आहे.

हेही वाचा: Family Welfare Surgery Camp : कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांसाठी सर्जन मिळत नसल्याने कॅम्प बंद!