नोव्हेंबरअखेर इयत्ता २ री ते ८ वीची ‘पॅट-२’ चाचणी

नोव्हेंबरअखेर इयत्ता २ री ते ८ वीची ‘पॅट-२’ चाचणी
Published on: 
नोव्हेंबरअखेर दुसरी ते आठवीची ‘पॅट-२’ चाचणी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांचा समावेश; अध्ययन निष्पत्ती तपासून अध्यापनात सुधारणा करण्यावर भर सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. ३ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी-१ (पॅट-२) घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात ही चाचणी होणार असून, याबाबत परिषदेने २ ऑक्टोबर रोजी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. या चाचणीत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांचा समावेश असेल. प्रथम सत्रातील प्रचलित अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्नपत्रिका असतील. विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केल्या आहेत, हे तपासून त्यानुसार अध्यापनात आवश्यक सुधारणा करणे हा चाचणीचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शैक्षणिक वर्षात दोन नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पहिली चाचणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, तर दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी एप्रिल २०२७मध्ये घेण्यात येणार आहे. केंद्रपुरस्कृत ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत या चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम चाचणीचा उपयोग केवळ गुण तपासण्यासाठी न करता विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगती आणि अडचणी ओळखण्यासाठी केला जाणार आहे. अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करणे, तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांची संपादणूक वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. २५ ऑक्टोबरपासून प्रश्नपत्रिकांचे वितरण प्रश्नपत्रिका विद्यार्थीनिहाय उपलब्ध करून देण्यात येणार असून, अंतिम विद्यार्थी संख्येनुसार त्यांचे वितरण करण्यात येईल. अंदाजे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय प्रश्नपत्रिका पोहोचविण्याचे नियोजन आहे. तालुका समन्वयकांनी प्रत्यक्ष मोजणी करून त्या बंद लखोट्यात मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यायच्या आहेत. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिकांचे छायाचित्र काढणे, समाजमाध्यमांवर प्रसारित करणे किंवा अनधिकृत प्रती तयार करणे यांसारखे प्रकार टाळण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहणार आहे. शाळांना निर्धारित कालावधीतच चाचणी पूर्ण करावी लागणार आहे. (बातमीसोबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचा लोगो अथवा संग्रहित छायाचित्र वापरावे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com