NSK26H32141 : विमल परदेशी
NSK26H32140 : राजू परदेशी
---------------------
पहूरजवळ अपघातात
सासू-जावई जागीच ठार
------
भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक
सकाळ वृत्तसेवा
पहूर (ता. जामनेर), ता. १२ : पहूर-शेंदुर्णी मार्गावर घोडेश्वरबाबा मोरीजवळ भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सासू व जावई जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी (ता. १२) दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विमल ओंकार परदेशी (वय ७०) व राजू बाबूलाल परदेशी (५६) अशी मृतांची नावे आहेत.
सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथील रहिवासी राजू बाबूलाल परदेशी यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त आलेल्या सासूबाई विमल ओंकार परदेशी यांना त्यांच्या मूळगावी गोंडखेल (ता. जामनेर) येथे सोडण्यासाठी दुचाकीने (एमएच १९, ईएच ०४९९) पहूरमार्गे जात होते. मात्र, घोडेश्वर बाबा मोरीजवळ समोरून आलेल्या भरधाव मालवाहू वाहनाने (एमएच १८, बीझेड ५५०८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राजू परदेशी व विमल परदेशी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन केले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विमल परदेशी यांचे पती व दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे त्या सध्या त्यांची मुलगी देवकाबाई यांच्याकडे राहत होत्या. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू परदेशी यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
गोंडखेल येथे अंत्यसंस्कार
विमल परदेशी यांच्यावर सोमवारी (ता. १२) सायंकाळी सातला गोंडखेल येथे अंत्यसंस्कार झाले, तर राजू परदेशी यांच्यावर मंगळवारी (ता. १३) सकाळी दहाला सातगाव डोंगरी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. याबाबत डॉ. संदीप पाटील यांच्या माहितीवरून पहूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस कर्मचारी योगेश सुतार तपास करीत आहेत.