
Anandacha Shidha : गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा! बघा काय काय मिळणार
नाशिक : दिवाळीप्रमाणेच येत्या २२ मार्चला साजरा होणारा गुढीपाडवा आणि त्यापाठोपाठ १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाकडून गोरगरीब कुटुंबांना शंभर रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. त्यात, रवा, डाळ, साखर, तेल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. (people get anandacha shidha on Gudipadwa Dr Ambedkar Jayanti nashik news)
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
पुरवठा विभागाच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना दिवाळीला ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला. त्याच धर्तीवर गुढीपाडवा व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त प्रत्येकी एक किलो रवा, हरभराडाळ, साखर, एक लिटर पाम तेलाचे किट प्रत्येकी शंभर रुपये दराने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२२ मार्चला गुढीपाडवा मराठी नववर्षारंभ आणि १४ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप होणार आहे. अवघ्या शंभर रुपयांत रवा, हरभराडाळ, साखर प्रत्येकी एक किलो व पाम तेलचे एक लिटरची पिशवी असे किट दिले जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात तब्बल सात लाख ९३ हजार ५९१ लाभार्थ्यांना दिवाळीत आनंदाचा शिधा किटचा लाभ दिला गेला. वेळेवर सर्वांना हा शिधा वितरित झाला.
दुकानदारांना आनंदाचा शिधावाटपाचे कमिशन, प्रत्येकी किटनुसार सहा रुपये असे दिले गेले होते, असे पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गुढीपाडव्याला साधारण २१ दिवस बाकी असले, तरी पुरवठा विभागाकडून शिधावाटपाची तयारी सुरू झाली आहे.