esakal | तळीरामांसाठी खूशखबर! घरपोच मद्यविक्रीला मिळाली परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

liquor

तळीरामांसाठी खूशखबर! घरपोच मद्यविक्रीला मिळाली परवानगी

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सध्या राज्‍यभरात संचारबंदी लागू असताना जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. ‍यामुळे मद्यविक्री दुकाने बंद असताना, आता जिल्ह्यात घरपोच मद्यविक्री (होम डिलिव्‍हरी) करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र या आहेत अटी...

सविस्‍तर दिशानिर्देश जारी

मद्यसेवनाचा परवाना असलेल्‍यांनाच घरपोच मद्य खरेदी करता येईल. यासंदर्भातील सविस्‍तर दिशानिर्देश जारी केले आहेत. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्‍य शासनाने जारी केलेल्‍या आदेशांनुसार मद्यविक्री येत्‍या ३० एप्रिलपर्यंत बंद आहे. मात्र, जिल्ह्यातील रेस्टॉरंट व बारला फक्त होम डिलिव्हरी सेवांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. व्‍यवसायाच्‍या ठिकाणी कोणत्‍याही व्‍यक्‍तीस प्रवेश देता येणार नाही. बाहेरील ग्राहकांसाठी सामान्‍य रेस्टॉरंट आणि बारप्रमाणेच बंधने पाळली जातील. यासंदर्भात जारी केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉटेलच्‍या कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेणे बंधनकारक असणार आहे.

परवाना असणे आवश्‍यक

सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत परवानाधारक विक्रेते मद्यसेवन परवाना असलेल्‍या ग्राहकांना मद्यपुरवठा करू शकतील. घरपोच सेवेतील कर्मचाऱ्यांनी संबंधितांच्‍या घर किंवा इमारतीच्‍या प्रवेशद्वारापर्यंतच सेवा पुरविण्यासाठी परवानगी असेल. यासंदर्भातील आदेशांचे उल्‍लंघन झाल्‍यास दंडात्‍मक कारवाई केली जाणार असल्‍याचे आदेशात स्‍पष्ट केले आहे. यात नमूद तरतुदीनुसार नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या मद्यविक्रेत्‍यांवर दहा हजार रुपये दंड केले जाईल. तर वारंवार उल्‍लंघन झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे स्‍पष्ट केले आहे.