
Nashik Crime News: आदिवासी आयुक्त असल्याचे भासवून फोटोकॉपी व्यावसायिकाची फसवणूक
सातपूर : गंगापूर रोडवरील फोटोकॉपी व्यवसाय करणाऱ्या तरुणाच्या वडिलांशी जवळीक साधत आदिवासी आयुक्त असल्याचे सांगत तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
वैभव प्रकाश देसाई (रा. अनुसयानगर) यांचा फोटोकॉपी, स्टेशनरीचा व्यवसाय आहे. त्यांना आदिवासी आयुक्त असल्याचे भासवून मनोज दत्तात्रय खोकले (रा. आडगाव- कोटमगाव, ता. येवला) याने आदिवासी विभागातील फोटोकॉपी आणि स्टेशनरीचच्या निविदेची कामे मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
खोकले याने आदिवासी विकास भवन येथे श्री. देसाई यांना बोलावत हे काम माझ्याकडेच असून, १४ महिन्यांची निविदा असेल, यासाठी तीन लाख रुपये अनामत भरावी लागेल, असे आमिष दाखविले. १२ सप्टेंबर २०२२ पासून काम सुरू होईल, त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागेल, तसेच या कामाचे सर्व शासकीय दस्ताऐवज करून देण्यात येईल.
खोकलेकडे असलेले शासकीय ओळखपत्र बघता श्री. देसाई यांना विश्वास बसला. या आमिषाला बळी पडत श्री. देसाई यांनी ५ ऑगस्ट २०२२ ला ऑनलाइन २० हजार, ८ ऑगस्टला ‘एनइएफटी’द्वारे एक लाख ४५ हजार, १० ऑगस्टला ऑनलाइन २० हजार, २१ ऑगस्टला ३० हजार, २ सप्टेंबरला कल्पेश अर्जुन ठाकरे या व्यक्तीच्या नावावर पाच हजार, असे दोन लाख २० हजार रुपये ऑनलाइन, तर ८० हजार रोख असे एकूण तीन लाख रुपये दिले.
वडिलांशी ओळख असल्याने श्री. देसाई यांनी विश्वास ठेवला. पैसे पूर्ण पाठविल्यानंतर २४ ऑगस्ट २०२२ ला जिल्हा सत्र न्यायालय आवारात बनावट दस्ताऐवजांवर खोकले याने श्री. देसाई यांची सही घेतली. २६ ऑगस्टला मूळ प्रत स्वत:कडे ठेवत दस्ताऐवजांवर तीन लाख रुपये न टाकता एक लाख ९५ हजार रुपये टाकले.
श्री. देसाई यांनी दस्ताऐवज मागितले असता टाळाटाळ केली. श्री. देसाई यांनी ९ सप्टेंबरला पुन्हा दस्ताऐवज मागितले असता खोकलेने मुख्यमंत्र्यांसोबत त्याचसंदर्भात बैठक असल्याचे सांगितले. २५ ऑक्टोबरपर्यंत खोकलेने चालढकल केली. ३१ ऑक्टोबरला जुना गंगापूर नाक्यावर प्रत्यक्ष भेटून रक्कम परत मागितली असता खोकलेने ८ नोव्हेंबरला तीन लाखांचा धनादेश दिला, परंतु त्यावर खोटी स्वाक्षरी केली.
दुसऱ्यावेळी धनादेश अडीच लाखांचा देत ५० हजारांची रोकड देतो, असे खोकलेने कबूल केले. परंतु या धनादेशावरही खोटी स्वाक्षरी केली. धनादेश न वटल्याने तक्रारदाराने आदिवासी विभागात चौकशी केली असता अशी कुठलीही व्यक्ती नसल्याचे कळले.
१२ नोव्हेंबरला कोटमगावला आई, पत्नी, आजी गेल्यानंतर मनोज खोकले याचा लहान बंधू गणेश याने तिघांना धमकी दिली. याचा जाब विचारल्यानंतर त्याने फोन उचलणे बंद केले असून, जीवितास धोका असल्याचे श्री. देसाई यांनी तक्रारीत नमूद केले आहे.