मालवाहू वाहन उलटून १० विद्यार्थी जखमी
---
उमाळ्याहून कंडारी जाताना अपघात; मद्यपी चालकाला यथेच्छ चोप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : जळगाव-अजिंठा महामार्गावरील उमाळा येथील माध्यमिक विद्यालयातील कंडारीच्या विद्यार्थ्यांनी बसअभावी मालवाहू पिकअपला हात दिला. चालकाने १० ते १५ विद्यार्थ्यांना वाहनात बसविले. कंडारीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. पैकी तीन विद्यार्थी गंभीर असून, त्यांना खासगी रुग्णालयात हलविले आहे. वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
जिल्हा रुग्णालयात गर्दी
उमाळा घाटाजवळील अपघाताची माहिती मिळताच उमाळा, चिंचोली व कंडारीच्या ग्रामस्थांसह मुख्याध्यापक पी. आर. कोळी यांच्यासह शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात आणले. संस्थाचालक, शिक्षकांसह पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पथक पाठवून अपघातग्रस्त पिकअप ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात ग्रामस्थ, पालक, नातेवाइकांची गर्दी झाली होती.
दरम्यान, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रोज रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला सोडले जाते. तेथून ते बसने घरी जातात, अशी माहिती कोळी यांनी दिली. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून अन्य वाहनाने कट मारल्याने पिकअप उलटल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार झाले. किरकोळ जखमींना घरी पाठविले, तर तीन मुलांना खासगी रुग्णालयात हलविले आहे.
चौकट
वाहनचालक नशेत?
मालवाहू वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मद्याचा वास आल्याने ग्रामस्थांनी चालकाला यथेच्छ चोप दिला. लोकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकालाही जिल्हा रुग्णालयात आणले होते.