esakal | पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

pimpalgaon gram panchayat

पिंपळगावच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात अव्वल

sakal_logo
By
दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : स्थापनेनंतर शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांची पावती आज मिळाली. ‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपळगाव ग्रामपंचायत राज्यात अव्वल ठरली आहे. राज्य पातळीवरचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या ८० वर्षांच्या वाटचालीतील आजचा सोनेरी क्षण ठरला. (pimpalgaon gram panchayat tops the state in Majhi vasundhara campaign nashik)

राज्याच्या पर्यावरण विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपळगाव ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. विविध अभिनव उपक्रम राबवून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने केला. त्यात वॉर्डात उद्यान, वृक्षारोपण, पिंकसिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ व सुंदर पिंपळगाव योजना राबविण्यात आल्या. त्याची दखल राज्य शासनाने घेत अभियानात राज्यात पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत अव्वल असल्याची घोषणा करीत पुरस्कार देण्यात आला.

…आणि एकच जल्लोष!

‘माझी वसुंधरा’ योजना पुरस्काराच्या यादीत पहिल्या दहा पुरस्कारांच्या यादीत पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचा समावेश असल्याचे शुक्रवारीच पर्यावरण विभागाकडून कळविण्यात आले होते. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पुरस्कार सोहळ्याची तयारी पिंपळगाव ग्रामपंचायत भवनात करण्यात आली. आमदार दिलीप बनकर, सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, मविप्रचे माजी संचालक विश्‍वास मोरे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात २९१ ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग घेतला होता. मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीच्या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. पहिल्या दहामध्ये कोणत्या क्रमांकाचे पारितोषिक मिळणार, याबाबत पिंपळगाव ग्रामपंचायत भवनात उपस्थित नागरिकांना मोठी उत्सुकता होती. मंत्री मुश्रीफ यांनी राज्यात पिंपळगाव बसवंत प्रथम, अशी घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट होऊन एकच जल्लोष करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सरपंच बनकर, ग्रामविकास अधिकारी जंगम यांनी ऑनलाइन पद्धतीने बक्षीस स्वीकारले. १९३५ मध्ये स्थापन झालेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतीची प्रथमच राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सरपंच अलका बनकर, ग्रामविकास अधिकारी जंगम यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: नाशिकमध्ये नवी नियमावली; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?

या वेळी निफाड पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार, सदस्य राजेश पाटील, सपना बागूल, गटविकास अधिकारी संदीप कराड, सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, महेंद्र गांगुर्डे, किरण लभडे, अल्पेश पारख, बापू कडाळे, छाया पाटील, सोनाली विधाते, दीपक मोरे, आशिष बागूल, कैलास वाघले, रामकृष्ण खोडे, दीपक विधाते, राहुल बनकर, नारायण पोटे, राजेंद्र खोडे आदी उपस्थित होते.

‘माझी वसुंधरा’ अभियानात सहभाग घेताना पारितोषिकांची अपेक्षा न ठेवता ग्रामपंचायत प्रशासनाने झोकून दिले. सदस्य व कर्मचाऱ्यांनी पिंपळगाव शहरातील वसुंधरा संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याला ग्रामस्थांची साथ मिळाली. घनकचरा प्रकल्पाचा मोठा प्रश्‍न मार्गी लागला. प्रथम पारितोषिक मिळाले, याचा आनंद आहे. पण, जबाबदारी अधिक वाढली आहे.

-गणेश बनकर, सदस्य, ग्रामपंचायत, पिंपळगाव बसवंत

(pimpalgaon gram panchayat tops the state in Majhi vasundhara campaign nashik)

हेही वाचा: ‘माझी वसुंधरा’ अभियान : नाशिक महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी!

loading image
go to top