धुळे : टुडे पान २ साठी..
---
फोटो क्रमांक : 31950
धुळे : शहरात पीएनजी गॅस योजना लागू करावी, या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना देताना ‘मी धुळेकर’ संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल. शेजारी दिनेश वाघ, संजय सरदार, छोटू पोतदार आदी.
---
धुळ्यात पीएनजी गॅस योजना लागू करा
‘मी धुळेकर’तर्फे मनपा अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ : आखाती देशांतील युद्धामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळित होऊन निर्माण झालेला तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी शहरात युद्धपातळीवर पीएनजी (पाअप नॅचरल गॅस) योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देत मागणी करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण होतो आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. याउलट ज्या शहरांमध्ये पीएनजी योजना लागू आहे, तेथे अशा समस्या उद्भवल्या नाहीत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी गॅस स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल आहे. पीएनजी गॅस वजनाने हलका असल्याने गळती झाल्यास त्याचे बाष्पीभवन होते; ज्यामुळे आगीचा धोका कमी असतो. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यात नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी, तसेच रुग्णालये, हॉटेल्स आणि उद्योगधंदे सुरळीत चालण्यासाठी शहरात पीएनजी यंत्रणा तत्काळ लागू करणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारही या योजनेसाठी आग्रही असल्याने महाराष्ट्रातील इतर शहरांच्या धर्तीवर धुळ्यात ही योजना लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना ‘मी धुळेकर’ संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, संजय सरदार, छोटू पोतदार, फरदिन शेख, सलमान पठाण, आफ्रिदी शेख उपस्थित होते.