
2 ते 3 रूपयांनी महागले पोहे; कच्या मालाच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम
बिजोरसे (जि. नाशिक) : कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. तर किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. (Poha become expensive by 2 to 3 rupees Impact on production due to shortage of raw materials Nashik Latest Marathi News)
गेल्या वर्षभरापासून जीवनावश्यक वस्तू, खाद्यान्नाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे तेलाचे दर गगनाला भिडले होते. पण, सध्या आता तेलाचे भाव कमी झालेले आहेत. पण, सूर्यफूल व शेंगदाणा तेलाचे फक्त पाच ते सात टक्केच दर उतरले असून, उर्वरित तेलांचे ३० ते ४० टक्के दर उतरले आहेत.
इंधन दरवाढीमुळे बहुतांश सर्व अन्य मालाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो पोह्यांच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याची माहिती किराणा दुकानदार व व्यापाऱ्यांनी दिली.
पावसाने अद्यापही देशभरात व महाराष्ट्रात थैमान घातले असून, बाजारात कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत आहे. या मालाचे उत्पादन साधारणत: गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने तेथील उत्पादक, प्रक्रिया उद्योजकांनी दरवाढ केली आहे. पावसामुळे सुद्धा परिणाम जाणवत आहेत. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास पोह्यांचे दर कमी होतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
प्रतिकिलो पोह्यांचे दर
पातळ पोहे : ४३ ते ४५
दगडी पोहे : ३३ ते ३९
साधे पोहे : ३६ ते ४३
"दगडी पोहे, पातळ पोहे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात. साध्या पोह्यांचा वापर नाश्त्यासाठी केला जातो. त्याला वर्षभर पोह्यांना मागणी असते. उपहारगृह चालक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच घरगुती ग्राहकांकडून वर्षभर पोह्यांना मागणी असते."
- रवींद्र भदाणे, व्यापारी, नवनाथ टेड्रर्स