
Police Driver Driving Test : ‘ड्रायव्हिंग’ चाचणीतून 94 उमेदवार ‘पास
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून आडगाव येथील नाशिक ग्रामीण मुख्यालय येथे पोलिस चालक पदासाठी उमेदवारांची ड्रायव्हिंगची चाचणी घेण्यात आली. चालक पदाच्या पंधरा रिक्त जागांसाठी मैदानी चाचणीनंतर गुणवत्तेनुसार निवडलेल्या १९६ पैकी १४० उमेदवारांनीच ड्रायव्हिंगची चाचणी दिली.
पन्नास गुणांच्या या चाचणीत ९४ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यांचा कटऑफ लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांचे लेखी परीक्षेकडे आता सर्वांचे लक्ष आहे. (Police Driver Driving Test 94 candidates passed driving test)
नाशिक ग्रामीण पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू आहे. २ आणि ३ जानेवारी रोजी चालक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळून मैदानी चाचणी घेण्यात आली. यात १ हजार २२ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले.
त्यातून खुल्या प्रवर्गात ५० पैकी ४५ गुण प्राप्त केलेल्या १९६ उमेदवारांची ‘कटऑफ’अंती पुढील चाचणीसाठी निवड झाली. गेल्या दोन दिवसांपासून वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठी उमेदवारांना पाचारण केले होते.
पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील मैदानात विविध प्रकारात जड व हलके वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीची गुणतालिका जाहीर झाली असून, लवकरच प्रवर्गनिहाय या चाचणीचा ‘कटऑफ’ जाहीर होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होत लेखी परीक्षेसंदर्भात कळविण्यात येणार आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
चालक पदे - १५
अर्ज प्राप्त - २,११४
मैदानी चाचणी दिलेले - १,०२२
मैदानीच्या गुणतालिकेनुसार पात्र - १९६
कौशल्य चाचणीत उत्तीर्ण - ९४