पोलिस कर्मचाऱ्याचा छळ अन् जीवे मारण्याची सुपारी

पोलिस कर्मचाऱ्याचा छळ अन् जीवे मारण्याची सुपारी
Published on: 
पोलिस कर्मचाऱ्याचा छळ अन् ठार करण्याची सुपारी --- कंपनी ‘सीईओ’सह चौघांवर अ‍ॅट्रॉसिटीन्वये गुन्हे दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून आणि पूर्ववैमनस्यातून पोलिस मुख्यालयातील पोलिस शिपायाला जातीवाचक शिवीगाळ करीत, ठार करण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात कंपनीचा ‘सीईओ’ आणि युवतीच्या भावासह चौघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानागो बिंदा दलाई (रा. चेहेडी पंपिंग रोड, नाशिक रोड), कपिल निगळ, रोशन शिंदे आणि राहुल लभडे (तिघे रा. सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस शिपाई अविनाश वसंत निरभवणे (वय ३०, रा. संदीपनगर, सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, निरभवणे यांनी जुलै २०२५ मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी घर सोडून निघून गेल्याने निरभवणे यांनी तिचा शोध घेतला. त्या दरम्यान संबंधित कंपनीचा ‘सीईओ’ मानागो दलाई याच्या घरी पत्नी मिळून आली असता, दलाई याने निरभवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत हुसकावून दिले आणि धमकी दिली. तसेच, १८ ऑगस्ट २०२५ ला संशयित कपिल निगळ व रोशन शिंदे यांनी निरभवणे यांना त्र्यंबक रोडवरील कृषी केंद्राजवळ बोलावून ‘तू आरक्षणावर पोलिस झालास, आमच्यासमोर तुझी लायकी नाही’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून अंगावर थुंकून अपमान केला व ठार करण्याची धमकी दिली. आंतरजातीय विवाहाचे पुरावे जाळून टाकण्यास नकार दिल्याने संशयितांनी कट रचून निरभवणे यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या गुन्ह्यामुळे निरभवणे यांना ४० दिवस कोठडीत राहावे लागले व खात्यातून निलंबितही व्हावे लागले. निरभवणे हे कोठडीत असताना ‘सीईओ’ मानागो दलाई याने त्यांना ठार करण्यासाठी मारेकऱ्यांना ५० लाख रुपयांची सुपारी व शस्त्र खरेदीसाठी पैसे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ​निरभवणे हे जामिनावर बाहेर आल्यावर १७ जुलै २०२६ ला सातपूर कॉलनी परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून ‘दलाईचा नाद सोड, नाही तर जीवाने जाशील’ अशी धमकी दिली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी पुढील तपास करीत आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com