
Nashik Crime News: नाशिकमधील पसार 1978 गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध! परराज्यातील 348 संशयित
नाशिक : शहर आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करून पसार झालेल्या एक हजार ९७८ संशयित गुन्हेगारांचा शहर पोलिस शोध घेत आहेत. सर्वाधिक गुन्हेगार बहुचर्चित अंबड पोलिस ठाण्याच्याच हद्दीतील आहेत.
पसार झालेल्या गुन्हेगारांची शोधमोहीम शहर पोलिसांकडून वेळोवेळी राबविली जाते. परंतु यात अपूर्ण नाव-पत्ते आणि तपशिलांचा अभाव असल्याने अशा गुन्हेगारांचा शोध पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यातही ३४८ गुन्हेगार परराज्यातील आहेत. (Police search for wanted 1978 criminals in Nashik 348 suspects from abroad Nashik Crime News)
नाशिक शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ पोलिस ठाणे असून, या ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेले संशयित गुन्हेगार अनेक वर्षे होऊनही पोलिसांना सापडलेले नाहीत. गुन्हा घडल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होतो.
संशयित गुन्हेगाराची त्या वेळी अपुरी माहिती असते. गुन्ह्याचा तपास सुरू होईपर्यंत संशयित गुन्हेगार अपुरी माहिती, अपूर्ण नाव व पत्ता यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते. राज्य-परराज्यातील पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचीही पुरेशी माहिती नसल्याने त्यांचा शोध घेता येत नाही.
या कारणांमुळे काही वर्षांपासून एक हजार ९७८ संशयित गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामध्ये शरीराविरुद्धाच्या गुन्ह्यातील ६६७, तर मालाविरुद्धाच्या गुन्ह्यातील एक हजार ३११ संशयित गुन्हेगार आहेत. यापैकी नाशिक शहरातीलच एक हजार १७८ संशयित गुन्हेगार असून, राज्यातील ४५२, तर परराज्यातील ३४८ संशयित गुन्हेगार शहर पोलिसांना पाहिजे आहेत.
राज्य-परराज्यातील ८०० संशयित
राज्य-परराज्यातून शहरात आले असता, त्यांच्या हातून गुन्हा घडतो आणि ते शहर सोडून पसार होतात. अशा विविध गुन्ह्यांमध्ये शहर पोलिसांना पाहिजे असलेले राज्य-परराज्यातील ८०० संशयित आहेत. या संशयितांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांचा शोध घेण्याचे जटिल काम पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
पोलिस ठाणे : पसार गुन्हेगार : शहरातील : राज्यातील : परराज्यातील
आडगाव : ७१ : ४५ : १६: १०
म्हसरूळ : १५ : १३ : ०० : ०२
पंचवटी : १२४ : ३३ : ५३ : ३८
भद्रकाली : १६१ : ७७ : ३३ : ५१
मुंबई नाका : ४८ : ३५ : १० : ०३
सरकारवाडा : ३२४ : १९६ : ६५ : ६३
गंगापूर : १५३ : ८२ : ५१ : २०
सातपूर : ९५ : ७२ : ०३ : २०
अंबड : ३३८ : २४५ : ५३ : ४०
इंदिरानगर : १०३ : ४१ : ४० : २२
उपनगर : २०८ : १४० : ४९ : १९
नाशिक रोड : २२० : १३७ : ४५ : ३८
देवळाली कॅम्प : ११८ : ६२ : ३४ : २२
एकूण : १९७८ : ११७८ : ४५२ : ३४८
"नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाहिजे असलेल्या संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या असता, काही संशयितांचे पत्ते व नावे अपूर्ण असल्याने त्यांचा शोध घेणे अडचणीचे ठरत आहे. तरीही संबंधित पोलिस ठाण्यांकडे संशयित गुन्हेगारांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार शोध घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत."
- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा, नाशिक