मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पोलिस हटविणार

आयुक्तांचे आश्‍वासन; गावठाणातील स्मार्ट प्रकल्पांवरून शिवसेना आक्रमक
nashik
nashiksakal

नाशिक : स्मार्टसिटींतर्गत गावठाणात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांवरून स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, सोमवारी (ता. २७) महापालिका व पोलिस आयुक्तांना निवेदन देत कामांच्या चौकशीची मागणी केली, तर मुख्य रस्त्‍यांवरील अतिक्रमण हटविण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांनाच असल्याचा दावा करत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सवर कारवाईचे आश्‍वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

स्मार्टसिटींतर्गत गावठाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. धुमाळ पॉइंट ते नेहरू चौकादरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून कामे सुरू असल्याने या भागातील अर्थकारण संपुष्टात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की गावठाणात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण न झाल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

फोडलेल्या रस्त्यांवर करारानुसार काम न करता पीव्हीसी पाइप टाकून रस्ते बुजविले जात आहेत. स्मार्ट विद्युत प्रकल्प राबविताना निष्काळजीपणा दिसून येत असून, एका ठिकाणी दोन पथदीप बसविले आहेत. या वेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी महापौर वसंत गिते, ॲड. यतीन वाघ, विनायक पांडे, संजय चव्हाण, महंत सुधीरदास पुजारी, गिरीश नवले, नरेश पारख, प्रतीक काळे, राजेंद्र दिंडोरकर, अनंत सोनवणे, अमर सोनवणे, सुनील पिंपळे आदी उपस्थित होते.

हॉकर्सवर शिवसेनेचा निशाणा

स्मार्टसिटीच्या कामांवर रोष व्यक्त करत असतानाच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार करताना वाढत्या अतिक्रमणांमुळे कायदा व सुव्यवस्थेची भीती व्यक्त करण्यात आली. अतिक्रमण हटविण्याचे पोलिसांचे काम असल्याची बाब कायद्याचा आधार घेऊन पोलिस आयुक्त पांडे यांनी मांडताना तातडीने अतिक्रमण हटविण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. यापूर्वी पोलिस आयुक्तांनी राजकीय पक्षांनी होर्डिंग्ज लावताना पोलिसांची परवानगी बंधनकारक केली आहे. आता पोलिस आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी घेतल्याने शहरात स्वागत होत आहे.

nashik
नाशिक : सिन्नरमधील दूध भेसळीचे थेट कनेक्शन मुंबईशी...

शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा या मुद्द्यांवर रोख

  1. गावठाणातील रस्ते अधिक अरुंद होणार

  2. नवीन रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप

  3. पांरपरिक गरुडरथाला नवीन रस्त्यांमुळे अडथळा

  4. सांस्कृतिक वैभव असलेला पिंपळपार नष्ट होण्याची भीती

  5. रस्ते अरुंद झाल्याने अग्निशमन बंब पोचण्याची शक्यता कमी

  6. रस्त्यांमुळे वाड्यांना धोका

  7. पुराचे पाणी आणण्याची शंका

नेहरू चौकात रस्ते तयार करताना अस्तित्वातील इमारती, रस्ता रुंदीकरण व लगतच्या रस्त्याच्या जागेचा विचार केला नाही. रस्तेकामामुळे पुराचे पाणी नेहरू चौकातून सराफ बाजारात आणण्याचा पुन्हा प्रयत्न असल्याची शंका शिष्टमंडळाने व्यक्त केली. जुन्या इमारतींना जाण्याचा रस्ता बंद केला जात असून, या भागातील व्यापारी देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. आरसीसी गटारींवर स्लॅब टाकून पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, ढाप्यांमधून पाणी न वाहिल्यास पुन्हा रस्त्यांवरूनच पाणी वाहणार असल्याने या कामाची आश्‍यकता नसल्याची बाब नमूद करण्यात आली. स्लॅबमुळे गटारींची स्वच्छता होणार नसल्याचे निदर्शनास आणले.

मदत वाटपापासून मनसेत गटबाजी

पावसाळ्यात राज्यात विविध ठिकाणी आलेल्या पुरामुळे आर्थिक नुकसान झालेल्या नागरिकांना मनसेच्या नगरसेवकांनी आर्थिक मदत देऊन हात पुढे केला खरा, पण मदत देताना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना डावलल्याने पक्षातील गटबाजी समोर आली आहे. अन्य पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे दिल्याने ही धुसफूस वाढली असून, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गटबाजी टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मनसेच्या महापालिकेच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे ७६ हजार दोनशे रुपये मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धनादेश जमा करताना मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, गटनेत्या नंदिनी बोडके, नगरसेवक योगेश शेवरे, वैशाली भोसले उपस्थित होत्या. गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. त्यात १२२ शाखाध्यक्षांच्या नियुक्‍ती केली. शाखाध्यक्षांचा मेळाव्यात गटबाजी करू नये, असा सल्ला दिला होता. ठाकरे यांचा दौरा विस्मरणात जात नाही, तोच गटबाजी उफाळून आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com