esakal | जायकवाडीच्या पाणी वापराबद्दलचे प्रश्‍नचिन्ह! राजकीय गदारोळाला फोडणी
sakal

बोलून बातमी शोधा

jaikwadi dam

जायकवाडी पाणी वापर; आकडेवारीची राजकीय गदारोळाला फोडणी

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : नद्याजोड प्रकल्पाचा निधी देताना गुजरातला पाणी देण्यासोबत नाशिकमधील जलसंपदाची कार्यालये (nashik Water Resources Offices) औरंगाबादला हलविण्याच्या मराठवाड्यातील आग्रहावर उठलेल्या राजकीय गदारोळाला जायकवाडीच्या पाणी वापराच्या प्रश्‍नचिन्हाची फोडणी बसली आहे. जायकवाडी (jaikwadi dam) ६५ टक्के भरण्यासाठीचा सध्याचा जलसंचय ५२ की ५८ टक्के, असा प्रश्‍न आकडेवारीतून उभा राहिला आहे. जायकवाडीचा जलसंचय एक हजार १८५ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचला असून, जलसंपदाच्या संकेतस्थळावर गेल्या महिन्याभरापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार खरिपासाठीचा वापर ४१.४६० दशलक्ष घनमीटर दर्शविण्यात आला.

नाशिकच्या अधिकाऱ्यांना जायकवाडीकडे का पाठवले जात नाही?

उपलब्ध जलसंचय आणि वापराची आकडेवारी ११३०.२३४ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचते. उपयुक्त पाणीसाठ्याच्या तुलनेत हा साठा ५२ टक्के होत असला, तरीही नाशिककरांना ही बाब मान्य नाही. १ जुलै ते १५ ऑक्टोबर २०१८ मध्ये खरिपातील जायकवाडीचा पाणीवापर ३९५.९६ दशलक्ष घनमीटर दर्शविण्यात आला आहे. म्हणजे, साडेतीन महिन्यांत हा वापर झालेला असताना आता मात्र १५ ऑगस्टपर्यंत ४१.४६० दशलक्ष घनमीटर इतका कमी खरिपामध्ये वापर कसा होऊ शकतो, असा प्रश्‍न नाशिककरांना पडला आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून पाणी सोडत असताना नेमके किती पाणी सोडले जाते, हे तपासण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून औरंगाबादचे अधिकारी नाशिक जिल्ह्यात पाठवले जातात. मग प्रश्‍न आता अनुत्तरीत असा राहतो तो म्हणजे, प्रत्यक्ष जायकवाडीमधील सिंचन आणि बिगरसिंचनासह बाष्पीभवन झालेल्या पाण्याची स्थिती नेमकी काय आहे? हे पाहण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे नाशिकच्या अधिकाऱ्यांना जायकवाडीकडे का पाठवले जात नाही?

प्रश्‍नाचा तिढा सुटण्यास मदत

औरंगाबाद विभागामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १०७.२ टक्के पाऊस झाला होता. आता १३८.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील ९६४ प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ४८.९४ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ६७.६२ टक्के जलसाठा झाला होता. नाशिक जिल्ह्याचा विचार करता, गेल्या वर्षी ९५.१७ टक्के पाऊस झाला होता, तर आतापर्यंत ८१.८७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच २४ प्रकल्पांत ७२ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा ९१ टक्के होता. दरम्यान, जायकवाडी प्रकल्पातील जलसंचय खरिपातील पाणीवापरासह ६५ टक्के होईपर्यंत ऊर्ध्व गोदावरी समूहाच्या नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या आकडेवारीच्या गोंधळात पाणी सोडण्याचा मुद्दा तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज जायकवाडीसाठी एक टीएमसी पाणी रवाना होईल. पावसात सातत्य राहिल्यास याच गतीने आठवडाभर जायकवाडीकडे रवाना होणे आवश्‍यक असेल. परिणामी, पाण्याच्या मुद्द्यावर आग्रही असलेल्या लोकप्रतिनिधींकडून पाण्याच्या तापलेल्या तव्याविषयी कशा पद्धतीने भूमिका घेतली जाणार, यावर यंदाच्या पाणी सोडण्याच्या प्रश्‍नाचा तिढा सुटण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: भुजबळ-कांदे यांच्यात पॅचअप; कलेक्टरांच्या मध्यस्थीने मिटला वाद

धरणांतील जलसाठा, कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी, बॅक वॉटरचा उपयोग आदींची पडताळणी करण्यासाठी नाशिकच्या अधिकाऱ्यांना औरंगाबादला पाठविण्याची नाशिककरांची मागणी स्वाभाविक आहे. पण, प्रशासकीय उतरंडीमध्ये आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर सीडीओ मेरीच्या अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करून पाणी वापराचा नियमित सरकारला देण्याची व्यवस्था उभी करणे आवश्‍यक आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना आपण यासंबंधाने पत्र लिहिणार आहोत. -राजेंद्र जाधव, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी जलचिंतन संस्था

हेही वाचा: नाशिक : सामनगांवरोड परिसरात बिबट्याचा दिवसाढवळया वावर

loading image
go to top