Positive News: निराधार मनोरुग्ण महिलेला मिळाला आधार; पोलिस, सामाजिक संस्थांनी जपली संवेदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inspector Devidas Wanjale, Archana Jadhav, Mangesh Baviskar etc while sending a psychotic woman for treatment

Positive News: निराधार मनोरुग्ण महिलेला मिळाला आधार; पोलिस, सामाजिक संस्थांनी जपली संवेदना

इंदिरानगर (जि. नाशिक) : गेल्या कित्येक दिवसांपासून कोणाचाही आधार नसलेल्या आणि थंडी, ऊन पाऊस याचा सामना करत कसेबसे जगणाऱ्या मनोरुग्ण महिलेला हिरण्य चॅरिटेबल ट्रस्ट, आकांक्षा सामाजिक संस्था आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदना जपत उपचारार्थ अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ येथे पाठवले. (Positive News Destitute psychotic woman got Aadhaar police and social organizations maintained their senses nashik news)

राणेनगरजवळील शारदा शाळेसमोर असलेल्या मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून ही महिला होती. मिळेल तसे खाणे व एक छोट्याशा झोपडीत राहणे अशी दिनचर्या असलेल्या महिलेस कोण नातलग, ओळखीचे व्यक्ती आहेत हे तिला स्वतःलाही आठवत नव्हते.

कुणालाही जवळ येऊ न देणे, जवळ गेले असता अंगावर धावून येणे आणि शिवीगाळ करणे असे प्रकार घडत होते. अशा स्थितीत ऊन, पाऊस, थंडीमध्येदेखील या महिलेचे संरक्षण होणे व त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत हिरण्य ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश बाविस्कर (गुरव) यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ मानवसेवा या संस्थेशी संपर्क साधून या महिलेस उपचाराची अत्यावश्यक गरज असल्याचे सांगितले.

त्यांनीदेखील पुढाकार घेत नाशिक गाठले. मानवसेवा संस्थेचे दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास गुंजाळ, सिराज शेख, सागर विटकर, शुभांगी माने, सुरेखा केदार यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Police Felicitation : राज्यातील 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर

परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास वांजळे, महिला पोलिस कर्मचारी अश्विनी पवार, दत्तात्रेय चव्हाणके आदींसह कर्मचाऱ्यांनी महिलेस उपचाराकरिता पाठविताना मोलाचे सहकार्य केले.

ट्रस्टचे राजेश महाजन, अनिल वाघ, महेश चांदवडकर, अश्विनी सोनवणे, गोपाळ गुरव, योगेश ढिकले, डॉ. दिनेश महाजन यांसह पदाधिकारी उपस्थित होते. तर आकांक्षा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका अर्चना जाधव आणि सहकारी महिलादेखील पूर्ण वेळ थांबून होत्या.

उशिरा का असेना, परंतु या महिलेला आवश्यक त्या उपचारांचा आधार मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

हेही वाचा: President's Gallantry Award : निफाडच्या भूमिपुत्राने पटकावला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार