फोटो -16117
मालेगाव : प्रहार चित्रपट पाहताना ॲड. उज्वल निकम, शिक्षणमंत्री दादा भुसे आदी.
----
निकालाच्या दिवशीच निकम यांनी पाहिला ‘प्रहार’
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता.१६ : डोंगराळे येथील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याच दिवशी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या जीवनावरील ‘प्रहार’ चित्रपट मालेगावात पाहिला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह वकीलवर्गाचीही या वेळी उपस्थिती होती.
विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारीत प्रहार चित्रपट शुक्रवारी (ता.१६) सर्वत्र प्रदर्शित झाला. मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी हॉटेल ताज, ओबेरॉय-ट्रायडंट हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व नरिमन हाऊस येथे दहशतवादी हल्ला झाला होता. सरकार पक्षातर्फे ॲड. निकम यांनी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी कणखर युक्तिवाद केला होता. डोंगराळे घटनेतील आरोपीला न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. ॲड. निकम यांच्या कारकिर्दीत हा निकाल देखील महत्त्वपूर्ण असताना याच दिवशी प्रदर्शित झालेला ‘प्रहार’ त्यांनी येथील सिनेमॅक्स सिनेमागृहात बघितला.
मुंबई येथील २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधात त्यांनी मानवाधिकाराला धक्का न लावता अजमल कसाबला फासावर लटकावले. चार वकिलांचे शिष्टमंडळ इस्लामाबाद येथे जाऊन सबळ पुरावे गोळा केले. संपूर्ण खटल्यात त्यांनी सरकार पक्षाची मांडलेली बाजू, देशहित, कुटुंब व पत्नी ज्योती निकम यांची मिळालेली साथ आदी प्रसंग चित्रपटात दाखविले आहेत. उज्ज्वल निकम यांची भूमिका अभिनेता राजकुमार राव यांनी तर ज्योती निकम यांची वामिका गब्बी यांनी तसेच कसाबची भूमिका ललित प्रभाकर यांनी केली आहे. डोंगराळे येथील घटनेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ॲड. निकम, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह सिनेमागृहात आले. त्यांच्यासह मालेगाव बार वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुधाकर निकम, उपाध्यक्ष मलिक शेख, ॲड.संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा - ठाकरे, ज्येष्ठ वकील आर. के. बच्छाव, हर्षद तिवारी आदींसह वकील बहुसंख्येने सिनेमागृहात उपस्थित होते.