
Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; ‘रामतीर्थ'वरील मंदिरांचे जपावे पावित्र्य!
नाशिक : पर्यटन वृद्धीसह स्थानिक अर्थव्यवस्थेला आणखी ‘बुस्ट' मिळण्यासाठी ‘रामतीर्थ कॉरिडॉर' विकास हा आशेचा किरण ठरला आहे. ‘रामतीर्थ' परिसरात ऐतिहासिक, पुरातन मंदिरे असून ‘कॉरिडॉर' विकासात त्यांचा समावेश होणे आवश्यक बनले आहे. सध्यस्थितीत बहुतांश मंदिरांची पडझड झाली असून मंदिरांचे जतन करण्यासोबत पावित्र्य राखण्याचा मुद्दा नाशिककरांना महत्वाचा वाटतो. (Preserve sanctity of temples on Ramtirtha Nashik Latest Marathi News)
गोदावरी तीरावर दोन्ही बाजूंनी मंदिरांची मांदियाळी आहे. सतरावे शतक अन त्याआधीच्या काळातील मंदिरे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. मात्र मंदिरांच्या देखभालीचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला आहे. सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असून ती पूर्ण होण्याची नाशिककरांना प्रतीक्षा आहे. गोदावरीच्या पुरापासून महापुरापर्यंतच्या ठोकताळ्यासाठी नाशिककरांना आठवते ते म्हणजे, नारोशंकराचे मंदिर. झाडे-झुडूपांमुळे मंदिराचा प्रश्न तयार झाला आहे. नारोशंकराची घंटा निखळली आहे. त्याचबरोबर नीळकंठेश्वर मंदिर बहुतांश वेळ बंद असते. कपालेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.
दर्शनासाठी रूपरेषेची आवश्यकता
अन्य शहरांसह राज्यातून आलेल्या पर्यटक-भाविकांना परिसरातील मंदिरांविषयी फारशी माहिती नसते. त्यामुळे माहितीसाठी ‘रामतीर्थ' परिसरातील मंदिरांची रुपरेषा उपलब्ध व्हायला हवी. मंदिरांची नावे, नकाशे व अन्य सविस्तर तपशील नमूद करताना भाविकांना प्रत्येक मंदिराचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होईल हे महत्त्वाचे बनले आहे.
बारा वर्षांनी उघडते 'ते' मंदिर
रामतीर्थावर श्री सिंहस्थ गौतमी गंगा-गोदावरी भागिरथी मंदिरात दर्शनाची दुर्मिळ पर्वणी भाविक साधत असतात. कुंभमेळ्याच्या पूर्ण काळात आणि ज्येष्ठ शुद्ध दशमी अन् कार्तिक पौर्णिमा असे दोन दिवस मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले होत असते. मंदिरात गोदावरी माता मूर्ती व काशीची भागिरथी गंगा माता मूर्ती स्थापित आहेत. ठराविक मुहूर्तावर मंदिर खुले होत असले, तरी वर्षभर नित्याचे येथे पूजा होते.
मंदिराचे द्वार बंद ठेवले जात असल्याने बाहेर असलेल्या पादुकांची चरण पूजा केली जाते. कुंभमेळ्यात मंदिरात भाविकांसह देशभरातील साधू-महंत येत असतात. देशभरातील पवित्र नद्यांचे जल आणून गोदा मातेच्या चरणी अर्पण केले जाते. वर्षभरात दोनदा दर्शनाची संधी भाविकांना उपलब्ध होते. ज्येष्ठ शुद्ध दशमी (प्रकट दिन) आणि कार्तिक पौर्णिमा (देव दिवाळी) असे दोन दिवस दर्शनाची संधी भाविकांना उपलब्ध होते.
रामतीर्थ परिसरात मंदिरे
० श्री गंगा गोदावरी पंचकोठी
० सिंहस्थ गोदावरी
० कपालेश्र्वर
० पाताळेश्वर
० सुंदर नारायण
० श्री एकमुखी दत्त
० उमामहेश्वर
० यशवंतराव महाराज
० श्री काळाराम मंदिर
० सीतागुफा
० गोरेराम मंदिर
० पंचरत्नेश्वर
० नीलकंठेश्वर
० सांडव्यावरची (सप्तशृंग)
० नारोशंकर
० मुरलीधर
० भद्रकाली
० अहल्यादेवी
नाशिककरांच्या अपेक्षा
* दिवसभर मंदिर दर्शनासाठी राहवे खुले
* मंदिर परिसरातील टवाळखोरांचा व्हावा बंदोबस्त
* पुरोहित, पुजारी, व्यवस्थापकांसोबत साधावा समन्वय
* मंदिर देखरेखीसाठी समन्वय समितीची व्हावी स्थापना
* समितीकडून ठराविक कालावधीत बैठकीतून घेतला जावा आढावा
* मंदिर जनत करण्यासंबंधी तांत्रिक त्रूटींवर निघावा तोडगा