Nashik : मल्टी मोडल हबसाठी शासनाकडे प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मल्टी मोडल हबसाठी शासनाकडे प्रस्ताव

मल्टी मोडल हबसाठी शासनाकडे प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर बससेवेसाठी सिन्नर फाटा येथे डेपो उभारणीच्या जागेवर नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे लाइनची अलायमेंट याच जागेतून जात असल्याने बस डेपो किंवा अलायमेंट हलविण्याऐवजी शहर बस, महारेल व मेट्रो निओ या तीनही कंपन्यांकडून या जागेवर मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हब तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनासमोर ठेवला आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता महारेल, महामेट्रोला तातडीने नवीन बाबींची समावेश करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याच अनुषंगाने महासभेवर प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

सिन्नर फाटा येथे महापालिकेचा आरक्षित भूखंड आहे. सदरचा भूखंड रेल्वेला देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. परंतु, २०१७ च्या विकास आराखड्यात पब्लिक ॲमेनिटीसाठी आरक्षण पडल्याने महापालिकेने शहर बस डेपो उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे अकरा एकर जागेवर बस डेपो उभारण्याचे काम सुरू असतानाच नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादन होत असल्याने डेपोच्या जागेवरून रेल्वे लाइनची अलायमेंट जात आहे.

सदरची जागा महारेलकडे हस्तांतरित करण्याची मागणी झाल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिका व महारेल कंपनीचे नुकसान होण्याऐवजी महारेल कंपनीने ८० मीटरऐवजी अतिरिक्त जागा संपादित करून त्या जागेवर मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हबचा प्रस्ताव महारेल कंपनीकडे दिला. मेट्रो निओ प्रकल्पदेखील याच भागातून जाणार असल्याने नाशिककरांना एकाच वेळी रेल्वे, शहर बस व टायरबेस मेट्रो एकाच इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तीन मजली इमारत उभारून तेथे मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हब निर्माण करण्याचा प्रस्ताव महारेलसह महामेट्रो कंपनी समोर ठेवण्यात आला.

हेही वाचा: गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला ; आटपाडीत पोलिस तैनात

महारेल कंपनीने चाळीस एकर जागेवर हब उभारण्याचे प्राथमिक स्वरूपात मान्य केले आहे. त्यासाठी अतिरिक्त जागा संपादित केली जाणार आहे. आयुक्त जाधव यांनी राज्याच्या अर्थमंत्रालया समोर प्रस्ताव दिल्यानंतर तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. धोरणात्मक विषय असल्याने आयुक्त जाधव यांनी महासभेवर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यांत्रिकी विभागाला दिल्या.

मोडल ट्रान्स्पोर्ट हबमध्ये महत्त्वाचे

  1. महापालिका, महारेल व मेट्रो निओचा स्वतंत्र खर्च वाचणार.

  2. एकाच इमारतीमध्ये तीन प्रकारच्या ट्रान्स्पोर्ट सुविधा.

  3. पहिल्या मजल्यावर रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर बस तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो.

  4. ट्रान्स्पोर्ट हबच्या इमारतीमध्ये कमर्शिअल मॉल, थिएटर, ऑफिसेस, कार पार्किंगची सुविधा.

  5. प्रत्येक मजल्यावर सरकते जिने.

loading image
go to top