esakal | नाशिक शहरात तिसऱ्या लाटेचे संकेत; महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

corona third wave

तिसऱ्या लाटेचे संकेत; महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेचे (Corona third wave) संकेत मिळू लागल्याने महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करताना दररोज ४०० मेट्रिक टन ऑक्‍सिजन (Oxygen) उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पीएसए (PSA) प्रकल्प कार्यान्वित केले असून त्यातून २४२ मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. ज्या खासगी रुग्णालयांनी पीएसए प्लान्ट उभारले नाहीत, त्यांना नोटीस बजावण्याचे सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

तिसऱ्या लाटेचे संकेत मिळताच पालिका प्रशासनाला खडबडून जाग

गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लाट ओसरली. चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला. मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांकी पातळी गाठली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील पंधरवड्यापर्यंत १५ ते १६ कोरोना रुग्ण आढळून येत होते. परंतु, गेल्या काही दोन, तीन दिवसात पन्नासच्यावर रुग्णसंख्या आढळल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करत पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून महापालिकेने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा: हेल्मेट नसेल तर वाहन जप्त; चालकांचे सक्तीने होणार समुपदेशन

नाशिक शहरात कोरोना तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागल्याने महापालिकेतर्फे पीएसए (PSA) ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आले आहेत.

नाशिक शहरात कोरोना तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागल्याने महापालिकेतर्फे पीएसए (PSA) ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आले आहेत.

दररोज होणार 400 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती

कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, पंचवटी येथील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडिअम, संभाजी स्टेडिअम, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी दोन, तर ठक्कर डोम व अंबड आयटी सेंटर कोविड सेंटरमध्ये तीन, सुश्रुत रुग्णालय, गंगा ऋषिकेश रुग्णालय, कै. बाळासाहेब ठाकरे स्टेडिअम, धाडिवाल हॉस्पिटल, गंगा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक असे ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले आहे. सध्या शहरात २४१ मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होईल, असे नियोजन आहे. पीएसए प्लान्ट पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शहरात दररोज चारशे मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याची माहिती कोरोना नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली.

हेही वाचा: "शासन श्रद्धेच्या आड येणार नाही; पण निर्बंध पाळा"

मानधनावरील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षी मानधनावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देताना दरमहा त्यांचे नियमित वेतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुदत संपुष्टात आलेल्या मानधनावरील वार्डबॉयची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार नाही. ज्या खासगी रुग्णालयांनी पीएसए प्लान्ट उभारले नाही, त्यांना नोटीस बजावण्याचे सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.

loading image
go to top