घरातील महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावा : कृषिमंत्री दादा भुसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse

घरातील महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावा : कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक : महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ व महिलांच्या सन्मानासाठी ‘लक्ष्मी’ योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावावे, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले आहे.

कृषि महाविद्यालयांत महिलांचे प्रमाण अधिक

धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ येथे आयोजित महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे शेतकरी व शेतकरी गट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात कृषी मंत्री दादा भुसे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अनिताताई भुसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषि आयुक्तालयाचे संचालक विकास पाटील, कृषि संचालक कैलास मोते, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे व महिला शेतकरी उपस्थित होत्या.

कृषिमंत्री दादा भुसे पुढे म्हणाले की, कृषि क्षेत्रात 20 वर्षापूर्वी महिलांचे नगण्य असणारे प्रमाण वाढतांना दिसत आहे. कृषि महाविद्यालयांमध्ये देखील शिक्षण घेण्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. पंरतु केवळ 14 टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजनांच्या लाभापासून त्या वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील महिलेचे नाव सातबाऱ्यावर लावावे, असे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

कृषि क्षेत्राच्या विविध बाबींसाठी निर्णय घेतांना महिलांचा समावेश खूप आवश्यक असल्याचे आजच्या महिला शेतकरी परिसंवाद कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे. स्वत: निर्णय घेतल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या शेतीमध्ये अधिक जोमाने काम करतात. महिलांचा सहभाग वाढल्यास शेतीमधील निव्वळ नफ्यामध्ये वाढ होईल. पिकाच्या गुणवत्तेत वाढ होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, असा आशावादही दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

हळद व कापूस वेचतांना महिला शेतमजूरांना हाताला जखमा होवू नये यासाठी हातात मोजे व शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली पिशवी देण्याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. तसेच कमी वेळेत अधिक व चांगले काम कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण महिला शेतमजूरांना देण्याचे नियोजन आहे. शेती मध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पोकरा योजनेमध्ये चार हजार गावांमध्ये ‘कृषि मित्र’ऐवजी ‘कृषि ताई’ची नेमणूक केली असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

गेले दोन वर्ष कोरोना संकटाला आपण सामोरे जात होतो. पण त्याकाळात सर्व बंद असतांना शेती व शेतीकामे सुरु होती. कोरोनाकाळात शेतकरी कुंटुंबांच्या कष्टाने कुणाला भाजीपाला, धान्य, दूधाची कमतरता जाणवली नाही. त्यामुळे शेतकरी राजा व कणा आहेच त्याबरोबरच अन्नदेवताही असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

स्वत:च्या आरोग्यासाठी ‘परस’ बागेचा विकास करा

आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी राजा सर्व जगाच्या पोटाची काळजी घेतो. मात्र त्याचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतांना दिसते. त्यामुळे शेतकरी कुंटुबांने स्वत:च्या कुंटुंबियासाठी स्वत:च्या शेतात पाच ते दहा गुंठ्यात परस बाग विकसित करावी.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना बियाणे, रासायनिक खते, निविष्ठा याची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना दिली. तसेच व्यापाऱ्यांनी योग्यदरात दर्जेदार बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करुन द्यावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे भुसे यांनी यावेळी सांगितले.

या महिला शेतकऱ्यांचे लाभले मार्गदर्शन

महिला शेतकरी परिसंवादात मु. पो. बोरामनी, ता. दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील अनिता माळगे, बीड जिल्ह्यातील डॉ, भाग्यश्री टिकेकर, दाभाडी ता. मालेगाव जिल्हा नाशिक येथील भावना निकम, घाडगाव जि. जालना येथील सीताबाई मोहिते, दौंड जिल्हा पुणे येथील कमल परदेशी इत्यादी शेतकरी महिलांनी परिसंवाद सहभाग घेतला होता. यावेळी शेतकरी महिलांनी आपल्या मालाची विक्री, मार्केटिंग, शेती विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे.

यांचा झाला सन्मान

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान बजावणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते कृषी सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये पुनम डोखळे (मु.पो.खेडगाव ता.दिंडोरी), नितीन गायकर (गिरणारे ता. नाशिक), महेश गोवर्धन टोपले (मोहपाडा ता.पेठ), सखाहरी कचरु जाधव (कृष्णनगर ता. इगतपुरी), जगन्नाथ तुकाराम घोडे (घोडेवाडी, पो. टाकेद बु. ता. इगतपुरी), शरद संपत शिंदे (खडक माळेगाव ता.निफाड),गणेश भास्कर चव्हाण (उगाव ता.निफाड), ज्ञानेश्वर कारभारी गागुर्डे (दिघवद ता.चांदवड),बापु भाऊसाहेब साळुंके (वडनेर भैरव ता.चांदवड), रामदास नारायण ठोंबरे (पुरणगाव, ता.येवला), सागर मधुकर साळुंके (देवळाने, ता.येवला), गणेश रामभाऊ पवार (कळवण खु. ता.कळवण), दौलत पोपट शिंदे (कळवण खु. ता.कळवण), कैलास आनंदा देवरे (खालप ता.देवळा), बाबुराव राजाराम बोस (जानोरी ता.दिंडोरी), महेंद्र दिलीप निकम (दाभाडी. ता.मालेगाव),चंद्रकांत धर्मा शेवाळे (टेहरे, ता.मालेगाव),दत्तु छबुराव सोनवणे (पानेवाडी ता.नांदगाव),सचिन अशोक शिलावट (नागापुर ता.नांदगाव),दारणामाई स्वयमसहाय्यता शेतकरी गट,(पळसे ता.नाशिक), भुमीपुत्र शेतकरी बचत गट,(तळवाडे, ता.मालेगाव)

टॅग्स :Nashikdada bhuse