Rain Damage Crops : वीस मिनिटांच्या गारांनी कष्टावर फिरवले पाणी! आता कर्ज फेडायची चिंता

Rain Damage Crops
Rain Damage Cropsesakal

निफाड : आकाशात अवकाळीचे मळभ दाटून आलं आणि वीस मिनिटे पावसाऐवजी फक्त गाराच बरसल्या अन् पाहता पाहता सोन्यासारख्या द्राक्षांची डोळ्यादेखत माती झाली हो... सकाळी ७१ रुपये भावांनी झालेला द्राक्षबागेचा सौदाही फिसकटला, आता व्यापारीही येत नाही. आहे, तो माल फक्त सडत आहे.

अचानक आलेल्या या गारांनी माझे सर्वस्वच उद्‍ध्वस्त झाले आहे. साडेचार लाखांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता सतावत आहे. कुंभारी येथील ज्ञानेश्वर घंगाळे यांची ही हिरव्या शेतीची उद्‍ध्वस्त झालेली कहाणी ऐकताना कुणालाही हळहळ वाटावी. आता मायबाप सरकार किती आणि कशी मदत देणार, या भाबड्या आशेवर ते दिवस ढकलत आहेत.

Rain Damage Crops
Rain Crop Damage : वादळ व पावसाने गहू, मक्याला फटका; तहसीलदारांच्या आदेशानंतर पंचनाम्याला सुरवात

नाशिक जिल्ह्याची द्राक्षपंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख आहे. मात्र चार-पाच वर्षांपासून विपरीत परिस्थितीमधून येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी जात आहेत. त्यातच निफाड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या कुंभारी येथील ज्ञानेश्वर घंगाळे यांनी मोठ्या मेहनतीने पोटच्या पोरागत सांभाळलेल्या अडीच एकरवरील सोनाका जातीच्या द्राक्षबागेचा सौदाही झालेला. चांगल्या भावाच्या आणि उत्पन्नाची हिरवे स्वप्न रंगवत असतानाच अस्मानी संकट कोसळलं आणि वीस मिनिटांच्या गारांनी सर्वकाही मातीमोल झाले.

Rain Damage Crops
Heavy Rain Crop Damage : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी; शेतकऱ्यांसमोर संकट

घंगाळे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते निर्विकारपणे द्राक्षबागेकडे पाहत म्हणाले, ‘‘माझी एक हेक्टरमधील द्राक्षबाग हार्वेस्टिंग करायची होती. माझा निर्यातीसाठी प्लाट तयार झाला होता. १८ मार्चला पाचला गारांचा पाऊस झाला. सुरवातीला वीस मिनिटे फक्त गारांचा पाऊस पडला. इतक्या गारा पडल्या, की बागेत तीन ते चार इंच अक्षरशः खच पडला होता. पाहता पाहता सर्व बागच उद्‍ध्वस्त झाली. आता ही द्राक्षे घ्यायला कुणी तयार नाही.

आतापर्यंत या बागेवर चार ते साडेचार लाखांचा खर्च झाला आहे. आता राहिलेल्या बागेसाठी व्यापारी, बेदाणेवाले बोलविले, पण कुणीही घ्यायला तयार नाही. घडातून पाणी निघू लागल्याने या बागेतील द्राक्षांची विल्हेवाट लावणे एवढाच पर्याय उरला आहे. पुढच्या वर्षाचे द्राक्षबाग उभे करण्याचे त्राण आता राहिलेले नाही.

Rain Damage Crops
Unseasonal Rain damage : उत्तर महाराष्ट्रातील 35 हजारांहून अधिक हेक्टरची धूळधाण!

यातून एक रुपयाही मिळणार नसल्याने नव्याने कसे उभे राहायचे, याची चिंता लागली आहे. बागेसाठी घेतलेले बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या एकाच प्रश्नाने रात्रीची झोप उडाली आहे. त्यातच गारपीट झाल्यानंतर आमदार, खासदार, मंत्री यांनी भेटी दिल्या; पण मदतीचे काय, हा प्रश्‍न आहे. पंचनामे झाले, केवळ मलमपट्टी नको, मायबाप सरकारने यावर ठोस उपाययोजना करायला हव्यात.

पुढच्या वर्षासाठी ही बाग उभी करणे माझ्यासाठी जिकिरीचे झाले आहे. शेतकरी आत्महत्या का करतात, हे आतापर्यंत मी ऐकत होतो, वृत्तपत्रातून वाचत होतो; पण आता मला त्याची जाणीव झाली आहे. मी आत्महत्येचा विचारही करणार नाही, पण सरकारकडे विनंती निश्चित करेल, की सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे.

Rain Damage Crops
Unseasonal Rain : नुकसानग्रस्तांबाबत मुख्यमंत्र्यांकडून 'या' दिवशी होणार मदतीची घोषणा

संवेदनशील असलेल्या द्राक्ष पिकासाठी क्रापकव्हरींग दिले पाहिजे; अन्यथा शेतकरी हतबल होतील. मग त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. घंगाळे यांची ही व्यथा सरकारने विचारात घ्यावी, त्यांना तातडीची मदत द्यावी आणि द्राक्ष पिकाच्या नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण नव्याने आखावे ही तमाम द्राक्ष उत्पादकांची इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com