sharad-pawar and rajnath singh.jpg
sharad-pawar and rajnath singh.jpg

"शरद पवारांच्या हातात सूत्रे असले तरी हे सरकार अकार्यक्षम अन्‌ दिशाहीन": - राजनाथ सिंह

नाशिक : महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धची लढाई उत्तर प्रदेश अन्‌ कर्नाटककडून शिकावी, असा सल्ला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (ता. 8) दिला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात सूत्रे असलेल्या अकार्यक्षम आणि दिशाहीन सरकारमुळे कोरोनामध्ये महाराष्ट्र नंबर वन झाला, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. 

राजनाथसिंह : शरद पवारांच्या हातात सूत्रे असलेले अकार्यक्षम अन्‌ दिशाहीन सरकार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त "व्हर्च्युअल रॅली'द्वारे सिंह यांनी नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील 14 हजार मतदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांसमवेत मतदारांशी संवाद साधला. त्यासाठी दिल्लीत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री सुरेश प्रभू, भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, श्‍याम जाजू हे, तर कोल्हापूरमधून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबईतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धुळ्यातून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे उपस्थित होत्या. कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला, तरीही महाराष्ट्रातील जनता मजबुतीने उभी आहे, असे गौरवोद्‌गार काढत. सिंह यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धची लढाई उत्तर प्रदेश अन्‌ कर्नाटककडून शिकावी 

फोन केल्यावरही 16 तास रुग्णवाहिका येत नाही म्हटल्यावर पायी निघावे लागल्याचे पाहून दुःख झाल्याचे सांगत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. संकटामध्ये हात झटकणे हे राहुल यांचे योग्य नाही, असे म्हणत कॉंग्रेस पक्ष दिशाहीन झाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. एवढेच नव्हे, तर विरोधी पक्षाची मान्यता मिळावी एवढे कॉंग्रेसचे खासदार निवडून आले नाहीत, अशी खपलीही त्यांनी काढली. 

शिवसेनेचा स्वार्थ जनभावनेला भारी ठरला 
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपशी युती केली. महाराष्ट्रातील जनता फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करू इच्छित होती. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपला धोका दिला. शिवसेनेचा स्वार्थ जनभावनेला भारी ठरला, अशी टीका करत श्री. सिंह यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली हीच शिवसेना आहे काय? असा प्रश्‍न पडत असल्याचे सांगितले. 2013 मध्ये अर्थव्यवस्थेत जगात नवव्या स्थानावर असलेल्या भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये पाचव्या स्थानावर आणल्याचा दावा करत त्यांनी जलदगतीने पुढे निघालेल्या अर्थव्यवस्थेमुळे देशाला पहिल्या तीन क्रमांकांत आणण्याच्या प्रयत्नात कोरोनाने अडथळा आणल्याचे सांगितले. शिवाय केंद्राच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा महाराष्ट्राने अधिक फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. 

नाशिकची द्राक्षे अन्‌ जळगावच्या केळीसह नंदुरबारच्या आदिवासींची काढली आठवण 
श्री. सिंह यांनी नाशिकची द्राक्षे, जळगावची केळी अन्‌ नंदुरबारच्या आदिवासींची आठवण काढली. शेतमाल स्थानिक बाजारात विकण्याच्या सक्तीचा बाजार समिती कायदा केंद्राने रद्द केला. तसेच संपूर्ण देश एक बाजार हे भूमिका घेत केंद्र सरकारने देशात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली. तसेच आदिवासींची संस्कृती जोपासण्यासाठी केंद्राने योजना आखली, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी या वेळी दिली. 

भारत-चीन सीमेबद्दल संसदेत बोलणार 
भारत-चीनच्या सीमेवर काय चालले आहे, असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. सिंह यांनी त्याबद्दल संसदेत सांगणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की भारत- चीनच्या सीमा विवादाबद्दल सैन्यदल आणि डिप्लोमॅटिक चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक झाली आहे. चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी दोन्ही देशांची सहमती झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com