मेन
-------------
रामतीर्थ- गोदाघाट परिसराचा चेहरा बदलणार
९ कोटी २० लाखांत ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णोद्धार; जुन्या वाड्यांचेही संवर्धन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक वैभवाला नवा साज चढणार आहे. पंचवटीतील गोदाघाट आणि रामतीर्थ परिसरात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा मोठा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या कामासाठी तब्बल ९ कोटी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
नाशिकला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटनस्थळ बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेतून रामकाल पथ प्रकल्प सुरू आहे. याच प्रकल्पाची व्याप्ती आता वाढवली आहे. सुरुवातीला फक्त काही कामे होती, आता गोदाघाट, रामतीर्थ ते थेट मालेगाव स्टॅन्डपर्यंतच्या सर्व ऐतिहासिक वास्तू यात घेण्यात आल्या आहेत.
--
काय कामे होणार ?
या प्रकल्पात बालाजी कोट, गाडगे महाराज पूल परिसर, जुने वाडे आणि मंदिरांची दुरुस्ती केली जाणार आहे. मंदिरांच्या भिंती, खांब, छताची डागडुजी, दगडी कामाची जतन- संवर्धन पद्धतीने दुरुस्ती आणि तिथल्या विद्युत व्यवस्थेचे आधुनिकीकरण असे सर्व काम एकत्र होणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी ई- निविदा काढली होती. एकूण ५ कंपन्यांनी निविदा भरल्या, त्यातल्या ३ पात्र ठरल्या. त्यामध्ये सवानी हेरिटेज कन्झर्व्हेशन प्रा. लि. या कंपनीने सर्वात कमी दर दिल्याने त्यांनाच हे काम देण्याला मंजुरी मिळाली आहे. ही कंपनी हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनात तज्ज्ञ मानली जाते. गोदाघाट आणि रामतीर्थ हा नाशिकच्या ओळखीचा आत्मा आहे. कुंभात देश-विदेशातून लाखो भाविक येतात. मंदिरांचे जतन झाल्याने हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहणार आहे. शिवाय परिसराचे सौंदर्य वाढल्याने पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे रामकाल पथाचे काम आता अधिक वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.