
Rangpanchami : रंगोत्सवाची चाहुल लागताच रहाडी खोदण्याचे काम सुरू; जुनी तांबट गल्ली येथे तयारी!
जुने नाशिक : रंगपंचमीची चाहूल लागताच रंगप्रेमींना रंगोत्सवाचे विशेषत: रहाडीत (Rahad) रंग खेळण्याचे वेध लागत असतात.
त्यानिमित्त जुनी तांबट गल्ली येथील पेशवेकालीन रहाडीचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. (rangapanchami festival rahad digging work forstarted Preparation at Old Tambat Galli nashik news)
परिसरातील तरुणांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. शहरात होळीच्या पाचव्या दिवशी रंगोत्सव अर्थात् रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रंगपंचमी निमित्त रंग खेळण्याचा आनंद विशेषत: शहराच्या विविध भागातील रहाडींमध्ये घेतला जातो.
पेशवे काळापासून शहरात रहाड रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. जुनी तांबट गल्ली, तीवंधा चौक, दिल्ली दरवाजा, काजीपुरा, शनिचौक याठिकाणी पेशवेकालीन राहडी आहेत. इतर वेळेस बंद असणाऱ्या या रहाडी रंगपंचमीच्या चार दिवस अगोदर उघडल्या जातात. विधीवत् पूजा करून त्यांचे खोदकाम व त्यानंतर स्वच्छता केली जाते.
जुनी तांबट गल्ली येथील पेशवेकालीन रहाडीची शनिवारी (ता. ४) विधीवत पूजा करून रंगपंचमीच्या आठ दिवसापूर्वीच खोदकाम सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने रहाडीचा वरचा भाग खोदण्यात आला आहे. सोमवारी (ता. ६) पुढील खोदकाम करून रहाड उघडी करण्यात येणार आहे.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
पूर्वीचा शिल्लक असलेला रंग उपसा करून डागडुजी करण्यासाठी यंदा लवकर रहाड खोदण्यात आल्याची माहिती येथील रहाडोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. रंग खेळताना कुणासही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, याची खबरदारी घेत राहडीची डागडुजी करण्यासाठी रहाड उघडण्यात आली आहे.
यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गर्दी वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यानिमित्त उपाययोजना म्हणून आवश्यक ती कामे केली जात आहेत, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रहाड खोदकाम सुरू असताना परिसरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. खोदकाम सुरू असताना नागरिकांनी स्वतः रहाड परिसरात गर्दी करून खोदकामाचा आनंद घेतला.