मालेगाव महापालिकेच्या खर्चाचे विक्रमी अंदाजपत्रक मंजूर | Financial budget | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon Municipal Budget 2022

मालेगाव महापालिकेच्या खर्चाचे विक्रमी अंदाजपत्रक मंजूर

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेचे दशकातील सर्वाधिक ५८४ कोटी ५९ लाख १० हजार ८८ रुपयांचे ५७ लाख ७० हजार ८८ रुपये शिल्लकीचे प्रशासनाने सादर केलेले अंदाजपत्रक स्थायी समितीत किरकोळ दुरुस्तीनंतर स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले. शहरवासियांवर नवीन घरे, बंगले बांधणाऱ्यांना नव्याने आकारलेला मालमत्ता कर वगळता कुठलीही कर वाढ न करता गेल्या वर्षीच्या तुलनेत शंभर कोटीहून अधिक रुपयांचे हे अंदाजपत्रक आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकावर महासभेत चर्चा व दुरुस्तीनंतर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

दशकातील खर्चाची विक्रमी वाढ

अंदाजपत्रकात विक्रमी शंभर कोटी असलेली वाढ शासनाकडून भांडवली कामांसाठी मिळणारे ५० कोटीचे अनुदान, घरपट्टी सर्वेक्षणानंतर मालमत्ता करात होणारी ४० कोटी रुपये वाढ व विकास शुल्कसह अन्य उत्पन्नातून मिळणाऱ्या १३ कोटी वाढ गृहीत धरल्यामुळे झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सभेत शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकालाही मंजूरी देण्यात आली. मनपा कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी बाराला ऑनलाइन झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती जफर अहमद अहमदुल्ला यांना आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी प्रशासनातर्फे अंदाजपत्रक सादर केले. मुख्य लेखापरिक्षक तथा उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त हेमलता डगळे, सचिन महाले, सुनील खडके, नगरसचिव श्‍याम बुरकूल सभास्थानी होते. सदस्यांनी अंदाजपत्रकाच्या जमा-खर्च बाजुंचा अभ्यास व दुरुस्तीसाठी एक तास सभा तहकूब करण्याची विनंती केली. तासाभरानंतर तहकूब सभेला सुरवात झाली. या सभेत स्थायीने सुचविलेल्या किरकोळ दुरुस्तीसह कुठलीही वाढ व फेरफार न करता प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तत्पुर्वी आयुक्त श्री. गोसावी यांनी अंदाजपत्रकांची वैशिष्ट्ये सांगत मनोगत व्यक्त केले. चर्चेत सखाराम घोडके, अस्लम अन्सारी, नबी अहमदुल्ला, डॉ. खालीद परवेज आदींनी सहभाग घेतला. सभेला समितीचे सदस्य जिजाबाई बच्छाव, विठ्ठल बर्वेे, रजिया अब्दुल मजीद, कमरुन्निसा फारुक कुरेशी, रजियाबी शेख इस्माईल, छाया शिंदे, नसीम अल्ताफ शेख, अख्तरुन्नीसा सादीक अन्सारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ठराव नसतानाही जि.प.कडून यात्रा कर आकारण्याची परवानगी

अंदाज पत्रकातील वैशिष्ट्ये

* घरपट्टी सर्वेक्षणामध्ये मालमत्ता करात २२ कोटी रुपये वाढ अपेक्षित

* बीओटी तत्वावर सहा जागांचा विकास

* शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणासाठी सहा कोटीची तरतूद

* वाढीव शासन अनुदान लक्षात घेता मनपा हिस्स्यात वाढ

* मोसम नदी सुधारणा, संवर्धन, सुशोभिकरणासाठी २० कोटींची तरतूद

* सोमवार बाजार परिसरात बीओटी विकासातून व्यापारी संकुल, स्विमींग पूल, नाट्यगृह, टेनिस कोर्ट

* विविध विकास कामांचे तीन वर्षांपुर्वी कार्यारंभाचे आदेश देऊनही कामे सुरु न झाल्यास आदेश रद्द.

* भुयारी गटार योजना दुसऱ्या टप्प्यासाठी तरतू्द

* स्पिल ओव्हर खर्चात दिवसेंदिवस वाढ; शंभर कोटीची तरतूद.

* प्रशासन व वसुली खर्चही वाढताच

जमा रक्कम (लाखात)

जीएसटी अनुदान - १७००० (२९.१८ टक्के)

दर व कर - ५९०० (१०.१३ टक्के)

मालमत्ता उपयाेगिता महसूल - १०४१ (१.७९ टक्के)

जलदाय व्यवस्थेमुळे मिळालेल्या रकमा - २२४० (३.८४) टक्के

अनुदाने अंशदाने - २१८३ (३.७५ टक्के)

अनुदाने भांडवली जमा - २२३८३ (३८.४२ टक्के)

संकिर्ण - ७४५ (१.२८ टक्के)

भाग-३ (असाधारण निलंबन लेखे) - ३७७२ (६.१३ टक्के)

सुरवातीची शिल्लक - ३१९७ (५.४९ टक्के)

एकूण जमा - ५८४५९ (१०० टक्के)

हेही वाचा: नाशिक : 50 शेतकऱ्यांनी गुजरातमध्ये गिरविले कांदाप्रक्रियेचे धडे

खर्च - (रक्कम लाखात)

सामान्य प्रशासन वसुलीचा खर्च - ८८३० (१५.१६ टक्के)

सार्वत्रिक सुरक्षितता - १२३७ (२.१२ टक्के)

आरोग्य व सोयी - ५९१८ (१०.१६ टक्के)

शिक्षण - ३९१२ (६.७१ टक्के)

संकिर्ण व इतर- ६९५ (१.१९ टक्के)

अंदाजपत्रक - अ भांडवली खर्च - २५७९० (४४.२७ टक्के)

अंदाजपपत्रक-क पाणी पुरवठा व ड्रेनेज - ९७१० (१६.८५ टक्के)

भाग-३ असाधारण ऋण व निलंबन लेखे - २३१० (३.९६ टक्के)

अखेरची शिल्लक - ५८ (०.१० टक्के)

एकूण खर्च - ५८४५९ (१०० टक्के)

Web Title: Record Budget Estimate Of Malegaon Municipal Corporation Approved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashikBudget 2022