गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदाच घरपट्टीची विक्रमी वसुली | Latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recovery of property tax

गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदाच घरपट्टीची विक्रमी वसुली

नाशिक : महापालिकेकडून (NMC) 2021-22 या आर्थिक वर्षात गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक घरपट्टी विक्रमी वसुली झाली. प्रशासक व आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने हा आकडा वाढला. यंदा नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात घरपट्टीची २४ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या महिन्यात १७ कोटींची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षात ३१ मार्चअखेरपर्यंत घरपट्टीची १४९ कोटी ३७ लाख रुपये वसूल झाले आहे. (Recovery of property tax 24 crores in first month of this new financial year)

आयुक्त रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar) यांनी सूत्रे हाती घेताच उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत तसेच थकीत कर वसुलीकडे लक्ष केंद्रित करत त्यानुसार कर आकारणी विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. बड्या थकबाकीदारांवर कारवाई करताना थकबाकी वसुलीसाठी थेट शासकीय कार्यालयांमध्ये तगादा लावण्याची ही महापालिकेच्या (NMC) इतिहासातील कदाचित पहिलीच वेळ होती.

मार्चअखेरपर्यंत अधिकाधिक थकबाकी वसुलीचा अल्टिमेटम पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार कर वसुली विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नुसत्या सूचना न देता स्वत: उपायुक्त अर्चना तांबेदेखील या वसुली मोहिमेत सहभागी झाल्याने वसुलीची धार वाढली आणि त्याचा परिपाक वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या आर्थिक वर्षात जी काही घरपट्टीची वसुली झाली, यासाठी आयुक्तांपासून उपायुक्तांनी वसुलीकडे जातीने लक्ष दिल्याचा परिणाम दिसून आला. आता नवीन आर्थिक वर्ष २०२२-२३ सुरू झाले आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षांपेक्षा तब्बल १७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पहिल्या एप्रिल महिन्यात ६ कोटी ६९ लाख रुपयांची घरपट्टीची वसुली झाली होती.

वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना

या वर्षी २४ कोटी १९ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यात ५ टक्के सवलतीचा लाभ ४३७०० मिळकत धारकांनी घेतला आहे, तर ऑनलाइन १२ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोलही वाजविण्यात येणार आहे. त्याच बरोबर मेमध्ये ३ टक्के, तर जूनमध्ये २ टक्के सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन घरपट्टी भरणाऱ्यांना १ टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. यावर्षीच्या पहिल्याच महिन्यातील वसुली पाहता या वर्षी वसुली मोहीम थंडावली नाहीतर घरपट्टीची (Property Tax) वसुली मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.