
नाशिक : तब्बल दोन वर्षांनी वाजतगाजत आगमन झालेल्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणाऱ्या ११०० केव्हीची उच्च दाबाची विजेची तार ‘विघ्न’ ठरू पाहत होती. ‘श्रीं’ च्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीवेळी एका मंडळाच्या उंच गणेशमूर्तीमुळे विघ्न उभे राहिले होते.
त्यातच यंदा मोठ्या संख्येने उंच आकाराचे गणराया असल्याने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळासमोर मिरवणुकीत अडथळा ठरू पाहणाऱ्या या उच्च दाबाच्या वीजतारेचा प्रश्न उभा राहिला होता. याबाबत गणेश मंडळांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, अखेर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला काही दिवस राहिले असतानाच ही वीजतार भूमिगत केल्याने मिरवणुक मार्गातील मोठे विघ्न दूर झाले आहे. (Remove obstruction of dangerous power lines on Ganeshotsav 2022 immersion procession route Nashik News)
भद्रकालीतील फुले मार्केटसमोर ११०० केव्हीची उच्च दाबाची वीजतार दूध बाजार पोलिस चौकीच्या दिशेने रस्त्यावरून सुमारे ५५ फूट उंचावरून गेलेली आहे. रस्ता कॉँक्रिटीकरणावेळी भूमिगत तारा टाकल्या, परंतु वीज वितरण कंपनीकडून त्यांची जोडणी केलेली नव्हती. त्यामुळे काही महिन्यांपासून ही वीजतार भूमिगत करण्याची वारंवार मागणी होत होती.
दरम्यान, श्रींच्या प्रतिष्ठापनेच्यावेळी भद्रकालीतील दूध बाजारातील याच मार्गाने शिवसेवा युवक मित्रमंडळाच्या उंच आकाराच्या श्रींच्या मूर्तीला अडथळा निर्माण झाला होता. त्या वेळी या वीज वाहिनीचा प्रवाह बंद केल्याने मोठा परिसर अंधारात गेला. तर, गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूकही याच मार्गावरून जात असल्याने गणेश मंडळे सदरील वीजतार तत्काळ भूमिगत करण्यासाठी आक्रमक झाले होते.
याबाबत महापालिका आणि वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, रस्ता फोडण्यावरून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दुर्लक्ष होत असल्याने अखेर महानगर गणेश मंडळ संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोमवारी (ता. ५) सदर धोकादायक वीजतार भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले.
आज होणार चाचणी
भद्रकालीतील फुले मार्केटसमोरील ११०० केव्हीची ही वीजतार भूमिगत करण्यासाठी सिमेंट कॉँक्रिटचा रस्ता मार्केटच्या कोपऱ्यावर फोडून भूमिगत तारा शोधून जोडणीचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते. तर मध्यरात्री दुसऱ्या टोकावरील रस्ता फोडून मंगळवारी पहाटेपर्यंत सदरील जोडणीचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी (ता.६) काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेतली जाणार आहे.
"यंदा उंच आकारातील गणेशमूर्ती असल्याने विसर्जन मिरवणुकीवेळी ११०० केव्हीची ही वीजवाहिनी अडथळा ठरणार होती. वीजप्रवाह बंद केला तर मोठा परिसर अंधारात जाऊन वेळप्रसंगी काही दुर्घटनाही घडू शकली असती. त्यामुळे तातडीने वीजवाहिनी भूमिगत करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. त्यास अखेर यश आल्याने आता बाप्पाची मिरवणूक निर्विघ्न होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे."- समीर शेटे, अध्यक्ष, नाशिक महानगर गणेश मंडळ.