टुडे साठी (गौरव ठक्कर फोटो घ्यावा)
-------
घरांचे स्वप्न अधिक महाग होणार
ठक्कर : व्याजदर वाढीबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : भारतीय मध्यवर्ती बँकेने (रिझर्व्ह बँक) आपल्या पतधोरणात रेपो दरात २५ आधार अंकांची वाढ करून तो ५.५० टक्के केला आहे. वाढती महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता लक्षात घेता घेतलेला हा निर्णय व्यापक आर्थिक दृष्टिकोनातून समजण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली आहे.
मात्र, या दरवाढीमुळे गृहकर्ज महाग होणार असून सर्वसामान्यांच्या घर खरेदीच्या स्वप्नावर आर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पहिल्यांदाच घर घेणाऱ्या ग्राहकांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या वाढीचा अधिक फटका बसू शकतो. त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवलावरील खर्च वाढणार आहे. त्याचा परिणाम प्रकल्पांच्या आर्थिक नियोजनावर आणि भविष्यातील घरांच्या पुरवठ्यावर होऊ शकतो, असेही ठक्कर यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी व्याजदरातील वाढ ग्राहकांपर्यंत पोहोचवताना संतुलित, टप्प्याटप्प्याने आणि पूर्णपणे पारदर्शक भूमिका ठेवावी, अशी अपेक्षा क्रेडाईने व्यक्त केली आहे. महागाई नियंत्रणासाठी केलेली ही उपाययोजना तात्पुरत्या आणि समतोल स्वरूपाची असावी. महागाईचा दबाव कमी झाल्यानंतर मध्यवर्ती बँकेने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. देशातील स्थावर मालमत्ता क्षेत्राचा पाया मजबूत असून घरांच्या मागणीत अजूनही सातत्य आहे. आर्थिक शिस्त, ग्राहकांचा विश्वास आणि परवडणाऱ्या किमतीतील घरे यांचा समतोल राखून देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये या क्षेत्राचे योगदान वाढविण्यासाठी क्रेडाई, मध्यवर्ती बँक, केंद्र व राज्य शासन आणि वित्तीय संस्थांसोबत सातत्याने सकारात्मक सहकार्य करत राहील, असेही ठक्कर यांनी स्पष्ट केले. एकत्रित धोरणात्मक पाठबळ, स्थिर आर्थिक वातावरण आणि सक्षम कर्जपुरवठा यंत्रणेच्या जोरावर भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून आपली भूमिका कायम ठेवेल, असा विश्वास क्रेडाईने व्यक्त केला आहे.