बृहन्‍मुंबई पोलिस भरती परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसाद | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बृहन्‍मुंबई पोलिस भरती परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसाद

नाशिक : बृहन्‍मुंबई पोलिस भरती परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसाद

नाशिक : बृहन्‍मुंबई पोलिस आयुक्‍तालय क्षेत्राकरिता पार पडत असलेल्‍या पोलिस भरती प्रक्रियेंतर्गत नाशिकमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. रविवारी (ता.१४) शहरातील दहा केंद्रांवर झालेल्‍या या परीक्षेला उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीची स्‍थिती, एसटी कर्मचाऱ्यांचा संप या बाबी लक्षात घेता, स्‍थानिक उमेदवारांकरिता जिल्‍हास्‍तरावर ही परीक्षा घेण्यात आली. सुमारे दहा हजार उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.

कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, विविध पदांकरिता भरती परीक्षा होत आहेत. त्‍यातच गेल्‍या सुमारे दोन वर्षांपासून पोलिस भरती प्रक्रियादेखील रखडलेली होती. याचाच एक भाग असलेल्‍या बृहन्मुंबई पोलिस आयुक्‍तालय क्षेत्राकरीता भरती प्रक्रियेनेदेखील वेग धरला आहे. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावरील उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले होते.

हेही वाचा: जळगाव : दीडशतकी परंपरेचा श्रीराम रथोत्सव आज

अशात सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेला संप या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्‍तालयातर्फे नाशिकस्‍तरावर ही परीक्षा घेण्यात आली. रविवारी झालेल्‍या या परीक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्‍तालयाचे सहकार्य लाभले. दहा केंद्रांवर पार पडलेल्‍या या परीक्षेकरीता पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. उमेदवारांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेत परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले होते.

मेटल डिटेक्‍टरद्वारे तपासणी

परीक्षा केंद्रावर आलेल्‍या उमेदवारांची मेटल डिटेक्‍टरच्‍या साहाय्याने तपासणी करत वर्गात सोडण्यात आली. तसेच उमेदवारांना मास्‍क सक्‍तीचे केले होते. कोरोना विषयक नियमांचे पालन करताना आसन व्यवस्‍था करण्यात आली होती. गैरप्रकार टाळण्यासाठी अन्‍य विविध उपाययोजनादेखील केलेल्‍या होत्‍या.

loading image
go to top