esakal | रिक्षा-टॅक्सी चालकांची बोहनी नाही; गाडीचे थकले हप्ते

बोलून बातमी शोधा

Rickshaw and taxi drivers business stalled due to lockdown
रिक्षा-टॅक्सी चालकांची बोहनी नाही; गाडीचे थकले हप्ते
sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून नाशिकमधील रिक्षा-टॅक्सी चालकांची अवस्था बिकट झाली असून, जानेवारीपासून सर्व सुरळीत झाले असताना आता १५ दिवसापासून टॅक्सी चालकांची बोहनी सुद्धा झाली नाही आहे.

रोजंदारीवर व्यवसाय करणारा झालाय हतबल

रिक्षाचा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांवर व्यवसाय अवलंबून आहे. तर टॅक्सी चालकांचा नाशिक ते मुंबई आणि नाशिक जिल्ह्यांतर्गत होणाऱ्या फेऱ्यांवर व्यवसाय अवलंबून आहे. हे सगळे बंद झाल्याने एकूणच व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांचे जगणे मुश्कील झाले होते. आताही तीच परिस्थिती ओढवली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या गाडीचे हप्ते थकले आहेत. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने रिक्षा चालकांचा व्यवसाय थंडावला आहे. रोजंदारीवर व्यवसाय करणारा रिक्षाचालक हतबल झाला आहे.

हेही वाचा: प्राणवायू घेऊन "ऑक्सिजन एक्सप्रेस" नाशिकमध्ये दाखल! पाहा VIDEO

प्रवासी म्हणून मिळतात फक्त रुग्ण

रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसापासून प्रवासी म्हणून रुग्णच मिळत असल्यामुळे रिक्षा चालकांना रुग्णांचा आधार असल्याचे चित्र नाशिक शहरात आहे. दरम्यान, एक तर सर्व सुरु तरी करा, नाहीतर सगळे बंद तरी करा अशी हतबलता रिक्षा-टॅक्सी चालकांनी बोलून दाखविली.

लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. काही दिवसांपासून बोहनी झाली नसून एक तर पूर्ण लॉकडाउन करून सगळ्यांना घरी तरी बसवा नाहीतर सगळे सुरु तरी करा. कर्जाचे हप्ते थकले आहे.
-संजय खैरनार, संचालक-चालक, टॅक्सी मालक संघटना
गाडीत ५० टक्के क्षमतेला परवानगी दिलेली आहे. मुळात ही परवानगी परवडत नाही. जानेवारी पासून व्यवसायात चांगली स्थिती होती आता खूप बिकट अवस्था झाली असून प्रवासी मिळतील या आशेने रोज गाडी टॅक्सी स्टॅन्ड वर उभी करतो.
-अनिल काकड, टॅक्सी चालक
दवाखान्यातच जास्त फेऱ्या होत असून रिक्षा चालू असल्याने रुग्णांची सोय होत आहे. कोरोना लॉकडाउनमध्ये सगळे बंद ठेवण्यात आले आहे. आता कडक निर्बंध लावले गेले असताना रिक्षा चालू ठेवून प्रवासीच नसल्याने व्यवसाय होत नाही. अर्धा दिवस चालला जातो तरी बोहनी होत नाही.
-रोहिदास निकम, रिक्षा चालक

हेही वाचा: रुग्णालयात ३ पर्याय असूनही दुर्घटना! आरोग्य विभागाच्या अडचणी वाढणार?

कोरोना लॉकडाउनमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने देऊ केलेली मदत तुटपुंजी आहे. सगळे बंद असताना प्रवासी संख्या घटली आहे. काही दिवसांपासून सर्वाधिक प्रवासी रोज दवाखान्यात रुग्णांसोबत येणारे नातेवाईकच आहेत.
-मोहन गायकवाड, रिक्षा चालक