Road Safety Week : अपघात रोखण्यासाठी महामार्गांवर उपाययोजना; शहर वाहतूक शाखेकडून प्रबोधनात्मक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Safety Week

Road Safety Week : अपघात रोखण्यासाठी महामार्गांवर उपाययोजना; शहर वाहतूक शाखेकडून प्रबोधनात्मक उपक्रम

नाशिक : शहर- जिल्ह्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावर थर्मोप्लास्टिक पट्ट्या आखण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे, ठिकठिकाणी रॅम्बलरसहित रिफ्लेक्टरही बसविण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक शहर वाहतूक पोलिस शाखेकडूनही प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेषतः वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांच्या प्रबोधनावर भर दिला जात आहे. (Road Safety Week Measures on highways to prevent accidents Awareness activities by city transport department nashik news)

११ ते १७ जानेवारी यादरम्यान, राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिग्नल, ब्लिंकर्ससह ब्लॅक स्पॉटची तपासणी केली जात आहे. त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

तर, शहर आणि ग्रामीण वाहतूक पोलिसांची पथके नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. यासह महामार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी न्हाईने ब्लॅक स्पॉटसह क्रॉसिंगच्या ठिकाणी थर्मोप्लास्टिक पट्ट्याची आखणी केली आहे. परिणामी, वाहनांचा वेग कमी होत अपघात टाळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Nashik News : अतिक्रमित भूखंडाचा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात

थर्मोप्लास्टिक पट्ट्यांमुळे एकमेकांवर वाहने आदळण्याची शक्यताही कमी असल्याचे न्हाईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण विभागांसह इतर संस्था व संघटनांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातले निर्देश गृह विभागाने दिले असून, आता आठ दिवस वाहतूक सुरक्षेसह प्रबोधनावर विशेष भर असणार आहे.

रिक्षाचालक, शाळांमध्ये जागृती

नाशिक शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरात विविध प्रबोधनात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहरातील रिक्षाचालक- मालक संघटनांच्या बैठका घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना दिला जात आहेत.

त्याचप्रमाणे शाळा-महाविद्यालयांमध्ये वाहतूक शाखेच्या पथकांकडून वाहतूक नियमांचे पालन, वाहतुकीचे नियम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा: Nashik News : मान्यतेच्या पडताळणीसाठी शिक्षणची समिती नाशकात!