Nashik : समन्वयाअभावी रस्त्याचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

समन्वयाअभावी रस्त्याचे काम रखडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : नाशिक रोड बांधकाम विभाग आणि सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत वेळकाढूपणामुळे पिंपळगाव खांब ग्रामस्थांचा येथील रस्त्याचे काम रखडल्याने शहराशी संपर्क तुटेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून देवळाली -पाथर्डी रस्त्यावरील पिंपळगाव फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याचे दुखणे सुरू आहे. हा रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी जमीन देण्याबाबत केलेल्या विरोधामुळे मुळे हे रुंदीकरण सोडावे लागले.

दरम्यानच्या काळात या ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यात आली. त्यावेळेसदेखील त्यासाठी खोदलेला रस्ता अनेक दिवस तसाच पडून होता. ते काम पूर्ण झाले. त्यानंतर आहे त्याच स्थितीत या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय नाशिक रोड बांधकाम विभागाने घेतला. दरम्यान, पुढे एका शेतकऱ्याने त्याला पुन्हा विरोध केल्याने ते रखडले. मात्र, आता ते शेतकरी तयार झाल्याने हे काम सुरू करण्यात आले. वालदेवी नदीवरील पुलाच्या बाजूचा साधारण सातशे मीटरचा हा रस्ता सध्या दुरवस्थेत आहे. पाइपलाइनचे पाइप वरती आल्याने रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला. विशेष म्हणजे रस्त्याच्या अगदी मधून पाइप टाकले आहेत. मात्र, या पाण्याची पाइपलाइन सिडको विभागातर्फे पाथर्डीच्या भवानी माथा पाण्याच्या टाकीतून टाकल्या आहेत. त्यामुळे ही पाइपलाइन खाली नेण्याचे काम सिडको पाणीपुरवठा विभाग अखत्यारित येते, असे सांगत सध्या हे काम थांबले आहे.

मागील महिन्यात पाऊस सुरू झाला. त्यामुळे येथे पाणी साचल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले. आता पुन्हा एकदा हे काम थांबले आहे. त्यात पावसाचे वातावरणदेखील दिसून येत असल्याने ग्रामस्थांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. मोठ्या खड्ड्यातून हा रस्ता पार करण्याचे दिव्य सध्या ग्रामस्थांना करत आहेत. दोन्ही विभागांनी परस्पर समन्वय साधत तातडीने हे काम पूर्ण करून किमान आहे रस्ता चांगल्या स्थितीत वापरण्यायोग्य करून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

महापालिकेच्या दोन विभागांच्या जबाबदारीत हा रस्ता अडचणीत सापडला आहे. मात्र, विकासकामात स्थानिक शेतकऱ्यांनीदेखील अडथळा आणणे चुकीचे आहे. जमिनीच्या बदल्यात जर टीडीआर अथवा इतर लाभ हवे असतील तर मनपाकडे रीतसर मागणी केली पाहिजे. या समस्येबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ही समस्या मार्गी लावण्याची गरज आहे. आयुक्तांनी येथे भेट देऊन येथील स्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षा आहे.

- सोमनाथ बोराडे

loading image
go to top