
मालेगावातील रस्त्यांची चाळण; संततधारेने वसाहतीत चिखलाचे साम्राज्य
मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने (Constant rain) शहरातील विविध भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांवरही खड्डे (Potholes) पडले असून, रस्त्याच्या दुतर्फा सांडपाणी साचले आहे.
शहरात जुन्या महामार्गाचा काही भाग व कुसुंबा रस्ता वगळता कोणत्याही रस्त्याला दुतर्फा गटारी नसल्याने रस्त्यावर साचलेले पावसाचे सांडपाणी व्यावसायिकांसाठी डोकेदुखी झाले आहे. विविध सण उत्सवासाठी डागडुजी केलेल्या रस्त्यांवरील स्तर उडाला असून, त्यावरही लहान-लहान खड्डे पडले आहेत.
बहुसंख्य चौक खड्डेमय झाले आहेत. शहराजवळील हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधील विविध वसाहतीत चिखल, सांडपाणी, डास, मच्छर व चिलट्यांचे साम्राज्य झाले आहे. ही परिस्थिती साथ आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. (roads in malegaon damaged due to heavy rain mud nashik latest Marathi news)
शहरात प्रवेश करतानाच मोतीबाग नाका भागात खड्ड्यांना सुरवात हाेते. मोसम पूल चौकात भला मोठा खड्डा झाला असून, किमान येथे लोखंडी बॅरिकेट असल्याने नागरिकांच्या हा खड्डा तातडीने लक्षात येतो. खड्डा चुकवून दुचाकी अथवा चारचाकी जाऊ शकतात. काकाणी चित्रपटगृहासमोर मोसम पुलावर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यास ते निदर्शनास येत नाही. त्यामुळे वाहने आदळतात. ही स्थिती शहरातील अनेक रस्त्यांची आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशातच वाहने जाताना विविध खड्ड्यांमध्ये साठलेले सांडपाणी पादचारी व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
यातून वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही हाेत आहेत. शहरातील जुना महामार्ग, कुसुंबा रस्ता, डीके चौक रस्ता यांसह अनेक रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांवरही सर्वत्र चिखल झाला आहे. पूर्व भागातील जुने गाव, संगमेश्वर वगळता शहरातील बहुसंख्य भागातील रस्त्यांची स्थिती बिकट आहे.
हेही वाचा: Rain Update : आदिवासी भागासह गंगापूर धरण पाणलोटात मुसळधार
संदेश सिनेमॅक्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर वॉलफोर्ट व्यापारी संकुल ते राजेंद्र भोसले संपर्क कार्यालय, तसेच कॅम्प रोड ते मोहन सिनेमागृह हे दोन प्रमुख रस्ते पूर्णत: उखडले आहेत. दगड, खडी, मुरुम टाकून त्यांची डागडुजी करण्यात आली.
संततधारेने मुरुम उखडल्याने दगड, खडी वर आली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाट काढणे म्हणजे अग्निदिव्य झाले आहे. काकाजी मसाला ते स्टेट बँक कॉर्नर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी दहा वर्षांपासून मागणी होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यामुळे या भागातील रहिवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. वारंवार आंदोलन करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. कॅम्प भागातील शिवाजी रोड रस्ता, सोमवार बाजार चौक, सावंत हॉस्पिटल ते शिवाजी रोड रस्ता या भागात खड्ड्यांची मालिका आहे.
रमजानपुरा, द्याने, सोयगाव नववसाहत, चर्चगेट, म्हाळदे शिवार, भायगाव आदी भागांतील विविध वसाहतींमध्ये बहुसंख्य भागात कच्चे रस्ते असल्याने चिखलाचे साम्राज्य झाले आहे. डी. के. चौक ते सोयगाव सबस्टेशन या दौलती इंग्लिश मीडियमकडे जाणाऱ्या मुख्य कच्च्या रस्त्यावर तीन ठिकाणी अक्षरश: दोन दोन फुटाचे नाले वाहत आहेत. या भागातील रहिवाशांना दुचाकी व चारचाकी घरी नेताना नाकीनऊ येत आहे.
रस्त्यांची कामे वेळेत व दर्जेदार व्हावीत
आगामी काळात शहरात सिमेंट रस्ते करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने घेतले. नव्याने सुमारे १०० कोटी रुपये खर्चातून रस्त्यांची कामे होणार आहेत. यातील अनेक रस्ते मंजूरही झाले आहेत. काही कामांचे भूमीपूजनही झाले.
ठेकेदारांना कार्यादेश दिले आहेत. मात्र, कामे मार्गी लागत नसल्याने व संथ गतीने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात रोष आहे. आगामी काळात रस्त्यांची कामे निर्धारित मुदतीत व दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा: Nashik : गणेशमूर्ती कारागिरांना महापालिकेकडून नोटीस
Web Title: Roads In Malegaon Damaged Due To Heavy Rain Mud Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..