RTE Admission : पोर्टल ठप्प असल्याने आरटीई प्रवेशाचा खोळंबा! Deadline टळल्याने पालकांची वाढली चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE admission

RTE Admission : पोर्टल ठप्प असल्याने आरटीई प्रवेशाचा खोळंबा! Deadline टळल्याने पालकांची वाढली चिंता

सिन्नर (जि. नाशिक) : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची पालकांना प्रतीक्षा कायम आहे. फेब्रुवारी संपला तरी पोर्टल सुरू होत नसल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे.

यापूर्वी देण्यात आलेली २० फेब्रुवारीची डेडलाईन टळली असून शिक्षण विभागाकडून याबाबत स्पष्टता होत नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. (RTE admission stopped as portal blocked deadline missed parents became worried nashik news)

आरटीईच्या पोर्टलवर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी पाल्यांच्या नोंदणीबाबत अद्याप कोणतीही माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा आरटीईअंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार का असा प्रश्न वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना भेडसावत आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रवेशस्तराबाबतच्या नियमावलीत सुधारणा, तांत्रिक बदल करण्यात येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावरच पुढील प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात येते.

यंदाही ऑनलाइन अर्ज करण्यास पालकांना पुरेसा वेळ मिळणार का, प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तांत्रिक पातळीवरही याबाबतचे बदल करून पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे.

साधारणपणे १५ फेब्रुवारीपासून आरटीई प्रवेश संदर्भात प्रवेश इच्छुक बालकांची नोंदणी केली जाते. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून बालकाच्या नावे यूजर आयडी व पासवर्ड नोंद केला जातो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच शाळांचा पसंतीक्रम टाकून नोंदणी पूर्ण करावी लागते. यंदा फेब्रुवारी महिना संपला तरी पोर्टल सुरू होत नसल्याने पालकांची घालमेल सुरू आहे.

कोविडबाधितांचे प्रवेश होणार

‘आरटीई’अंतर्गत खासगी व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशाला यंदापासून कोरोनाबाधित बालकांचा समावेश करण्याचा निर्णय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. ज्या बालकाच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे अशा बालकांनाही या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

या नियमाची अंमलबजावणी करण्याची सूचना शिक्षण विभागामार्फत सर्व जिल्हास्तरावरील कार्यालयांना देण्यात आली आहे. यासह अनाथ बालकांनाही या नियमांतर्गत प्रवेश देण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना केली आहे. त्यामुळे या जागांवर बालकांना प्रवेश मिळाल्यास जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikRTEAdmission