ग्रामीण रुग्णालयाची चौकशी करा
तक्रारीची दखल; जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून समिती गठित
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १३ ः येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत असून, त्यांची नियमानुसार बदली करावी, तसेच रुग्णालयांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश देवरे यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती गठित केली आहे.
दिनेश देवरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. त्यात ग्रामीण रुग्णालयात काही कर्मचारी दीर्घकाळ कार्यरत आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे असून, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही त्यांच्या बदलीबाबत ठराव देखील झाले आहेत. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदस्थापना व सेवाकालाची माहिती तपासावी, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून शासन नियमानुसार बदली करावी, एकाच ठिकाणी कार्यरत राहण्याची कोणत्या अधिकाऱ्यांची परवानगी अथवा आदेश असल्यास त्याचीही चौकशी झाली पाहिजे. तपासणीत अनियमितता अथवा त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान तक्रारीची दखल घेत धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. समितीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव, प्रशासकीय अधिकारी राकेश भावसार आणि कार्यालय अधीक्षक खंडू ईशी यांचा समावेश आहे. समितीने तक्रारीतील मुद्द्यांची सखोल चौकशी करून अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
---
कोट
ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. ॲलोपथी वैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी आयुर्वेदिक अथवा होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी अधिक काळ सेवा देतात. थोड्या उपचारांसाठीसुद्धा धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवले जाते.
- दिनेश देवरे,
सामाजिक कार्यकर्ते, सोनगीर