एका ट्विटमुळे सागर युक्रेनमधून दिल्लीला रवाना

अनिकेत सोनवणे यांचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क
russia ukraine war update Jyotiraditya Scindia a tweet of Sagar Aniket Sonawane
russia ukraine war update Jyotiraditya Scindia a tweet of Sagar Aniket Sonawanesakal

इंदिरानगर : युक्रेनमध्ये अडकलेल्या सागर चव्हाण (रा. राजीवनगर) याला द्वारका मंडल भाजयुमोचे सरचिटणीस आणि नगरसेवक सतीश सोनवणे यांचे चिरंजीव अनिकेत सोनवणे यांनी रोमानियात असलेल्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यांनीही तातडीने प्रतिसाद देत अवघ्या साडेपाच तासांत त्याला दिल्लीकडे रवाना करण्याची व्यवस्था केली. रविवारी (ता. ६) सायंकाळी तो घरी पोचला.

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर सागर नोकरीसाठी युक्रेनला गेला आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकला. त्याच्यासोबत इतर ४० जण होते. हे सर्व जण २६ तासांचा रेल्वेचा प्रवास करून कसेबसे रोमानियामध्ये आले. स्थानिक लोकांनी तेथील व्हरसिटी चर्चमध्ये त्यांना ठेवले. आम्ही तुम्हाला फक्त तीन दिवस येथे ठेवू शकतो. त्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला सर्व सुविधा देण्याची आमच्याकडे व्यवस्था नाही, असे त्यांनी सांगितले. तुम्ही तुमच्या पातळीवर आता देशाशी आणि स्थानिक पातळीवर संपर्क साधा, असे सुचविले. नुकताच गेल्यामुळे सागर सैरभैर झाला होता. त्याची नेहमीची अनिकेतशी ओळख होती. त्यामुळे त्याने अनिकेतला १ मार्चला संपर्क साधला आणि सगळी आपबीती सांगितली. अनिकेतने थेट केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी बोलणे केले. त्यांनी अनिकेतला यासाठी आवश्यक असलेला एक अर्ज भरून पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यास सांगितले. तो त्याने भरून पाठविला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्याने परत एकदा डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी परत एकदा तो अर्ज भरण्यास सांगितले. मात्र, उशीर होत होता. तिकडे सागर घायकुतीला आला होता. दरम्यानच्या काळात अनिकेत सागरला हिंमत आणि व्यवस्था करीत असल्याचा विश्वासही देत होता.

दरम्यान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे रोमानियात ऑपरेशन गंगासाठी पोचले आहेत, हे कळल्यानंतर अनिकेतने त्यांना शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सागरबद्दल ट्विट केले. त्यांनी पाच वाजून १३ मिनिटाला त्याचे डिटेल्स पाठवा, असे सांगितले. अनिकेतने सागर आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एका परराज्यातील मनीष दवे याचा फोन क्रमांक, लोकेशन आदी माहिती दिली. श्री. शिंदे यांनी चेक करतो, असे सांगितले. अनिकेतने त्यांचे आभार मानले आणि ‘इट्स अवर ड्यूटी’ असे उत्तर त्यांनी दिले. शिंदे यांनी मग स्वतः सागरला फोन करून ‘काळजी करू नकोस. सगळी व्यवस्था करत आहोत,’ असा विश्वास दिला आणि एक तासात त्याने दिलेल्या पत्त्यावर बस पाठविली. बसद्वारे दोन तासांत त्याच्यासह इतरांना सुकेव्हा एअरपोर्टवर आणले आणि भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून ४० मिनिटांनी दिल्लीला रवाना केले. शनिवारी सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी सागर दिल्लीत पोचला. तेथून रविवारी सायंकाळी तो घरी आला. अनिकेत आणि त्याच्या युनिक ग्रुपच्या सदस्यांनी त्याचे स्वागत केले. सागरला आई नाही. नाशिकच्या सीएट कंपनीत नोकरीला असलेले त्याचे वडील नितीन आणि लहान भाऊ सुमीत यांनीही अनिकेतचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com