मेन
कुशावर्त तिर्थावर फडकला धर्मध्वज, सिंहस्थ पर्वास प्रारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण
-वेदमंत्र, शंखनाद आणि गोदावरी पूजनाने त्र्यंबकनगरीत आध्यात्मिक चैतन्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ : गोदावरीच्या उगमभूमीतील तीर्थराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाच्या परिसरात घुमणारा शंखनाद आणि वेदमंत्राच्या मंगलमय जयघोषात शनिवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शृंगेरी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वास प्रारंभ झाला.
त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे एकाच वेळी ध्वजारोहण असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिकला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला उपस्थिती दर्शविली. कुशावर्त तीर्थावर त्यांनी संत-महंतांचे स्वागत केले. पवित्र जलाचे पूजन करून विश्वकल्याणाचा संकल्प करण्यात आला. गणेशपूजन, देवतांचे आवाहन, गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेतून सिंहस्थ पर्व निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन झाले. ध्वजपताकांचे पूजन शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री आणि शंकराचार्य यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा करून भगवान त्र्यंबकेश्वराचे स्मरण केले. पुरोहितवृंदांचे मंत्रोच्चार सुरू असतानाच शंखनादाचा गजर झाला आणि धार्मिक जयघोषाने कुशावर्त परिसर दुमदुमून गेला. अशा मंगलमय वातावरणात धर्मध्वजारोहणाचा मुख्य विधी पार पडला. भगवा धर्मध्वज उंचावताच उपस्थितांनी जयघोष केला आणि मंगलमय वातावरणा सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. १९५६ नंतर प्रथमच त्रिखंडी योग जुळून आल्याने हा कुंभमेळा धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर ध्वजारोहनाचा मान नाभिक समाजाला आहे. नाभिक वतनदार संघातील गणेश मोरे, नीलेश मोरे यांना परंपरेनुसार यंदाही ध्वजारोहनाचा मान मिळाला. आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी यांच्यासह विविध संत-महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि भाविक उपस्थित होते.
..
गोदावरी आरतीने पूर्णाहुती
धर्मध्वजारोहणानंतर गोदावरी नदीची आरती करण्यात आली. आरतीचे स्वर, मंत्रोच्चार आणि शंखनादाने कुशावर्त तीर्थ परिसरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले. संत-महंत आणि उपस्थित मान्यवरांनी या धार्मिक सोहळ्याला साक्षी राहून सिंहस्थाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले.
…
धर्मध्वजाचे महत्त्व
धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ॐकार, स्वस्तिक आणि घंटा अशी विविध धार्मिक व ज्योतिषीय चिन्हे अंकित आहेत. सूर्य-चंद्रांचा अमृतकुंभाच्या रक्षणाशी, तर बृहस्पती आणि सिंह यांचा सिंहस्थाच्या कालगणनेशी संबंध जोडला जातो. मगर हे गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीक आहे. ॐकार आणि स्वस्तिक मांगल्य, आध्यात्मिकता आणि कल्याणाचा संदेश देतात. बारा घंटा, दहा दिशा आणि ''ह्रीं'' हे बीजाक्षर यांचाही धर्मध्वजाच्या रचनेत समावेश आहे. या प्रतीकांमधून सिंहस्थाच्या धार्मिक परंपरेची व्यापकता अधोरेखित होते.
...
पुरोहित संघाकडून पौराहित्य
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाची पूजा कुशावर्त तीर्थावर झाली. त्याचे पौराहित्य अखिल भारतीय पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष मनोज थेटे, सारंर दीक्षित, कौस्तुभ पाटणकर, श्रीविकास जोशी यांनी केले. त्यांना विशाल जोशी, विजन वाडेकर, धनंजय देशमुख, बाळासाहेब कळमकर, वामन जोशी यांनी सहकार्य केले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पौराहित्य मनोज थेटे, यजूश दीक्षित व सुयोग देवकुटे यांनी केले.
..
नवीन घाटांवर ध्वजारोहण
पेगलवाडी येथील प्रयागतीर्थ जवळ गोदावरी नदीवर ४.२ किलो मीटरचे नवीन घाट निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी विधिवत पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दहा आखाड्यांचे साधू महंत व सचिव उपस्थित होते. यंदाच्या कुंभमेळ्यानिमित्त या घाटांची प्रथमच निर्मिती करण्यात आली आहे. भाविकांना गोदावरी तीर्थात स्नान करणे सुलभ व्हावे या दृष्टीने या घाटांची निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी धर्म ध्वज उभारण्यात आल्याने नवीन कुशावर्त या नावाने देखील या घाटांची ओळख निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी साधू महंतांसह स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.