
Sahyadri Vineyard Ultra Run : द्राक्ष शिवारात आरोग्याचा जागर; विशाल अढाऊ ठरला विजेता
नाशिक : द्राक्ष मळ्यांच्या भोवतीने, नदीच्या काठाने बहरलेल्या निसर्गरम्य वातावरणात धावत रविवारी (ता. २६) हजारो आबालवृद्ध नागरिकांनी ‘सह्याद्री फार्म्स’ च्या विनियार्ड अल्ट्रा रन मॅरेथॉनचा आनंद घेतला. संगीताच्या तालावर विविध व्यायाम प्रकार तसेच झुंबा नृत्याने स्पर्धकांमध्ये जोश भरला. (Sahyadri Vineyard Ultra Run Vishal adhau winner nashik news)
रविवारी (ता. २६) सर्व नागरिकांसाठी ५ किलोमीटरचा टप्पा ठरविण्यात आला होता. सकाळी ६ वाजता दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील ‘सह्याद्री फार्म्स’च्या प्रवेशद्वारापासून या मॅरेथॉनला सुरवात झाली. निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा आनंद अवर्णनीय असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी स्पर्धकांमधून उमटल्या.
शेतांच्या काठाने धावताना आणि शेतकऱ्यांच्याच पुढाकारातून असलेली मॅरॅथॉन वेगळी ठरली. सह्याद्री फार्म्स आणि ब्ल्यू ब्रिगेड आयोजित विनियार्ड अल्ट्रा रनचा लांबपल्ल्याचा टप्पा गुरुवार (ता. २३) पासून सह्याद्री फार्म्सच्या शिवारात सुरू झाला.
यात ३३८ किलोमीटर, १०० किलोमीटर, ५० किलोमीटर हे अंतिम उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. सलग ४ दिवस धावत धावपटूंनी अंतिम उद्दिष्ट गाठले. अत्यंत चुरशीच्या लांबपल्ल्याच्या अल्ट्रा रनचा विशाल अढाऊ हा प्रथम विजेता ठरला.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
अशोक मकवाना द्वितीय, तर तृतीय विजेते म्हणून असगर लकडावाला, माल्कम डिसोझा, खोसेम रंगवाला यांनी विजेतेपद पटकावले. प्रथम पारितोषिक विजेता विशाल अढाऊ याने ३३८ किलोमीटरचा पल्ला ६८ तास आणि २७ मिनिटात पूर्ण केला, तर धावपटू अशोक मकवाना याने १०० किलोमीटरचा टप्पा निर्धारित वेळेत पार करीत द्वितीय विजेतेपद पटकावले.
असगर लकडावाला यांनी ७० किमी, तर माल्कम डिसोझा, खोसेम रंगवाला यांनी ५० किलोमीटरचे अंतर निर्धारीत वेळेत पूर्ण केले. अल्ट्रा मॅरेथॉन बरोबरच ५ किलोमीटर, १० किलोमीटर, २१ किलोमीटर आणि ४२ किलोमीटर अंतर पार करणाऱ्या धावपटूंनी मॅरॅथॉन रंगतदार होत गेली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील क्रिडा विभाग प्रमुख हेमंत पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. निवृत्त आरटीओ पोलिस अधिकारी नारायण वाघ सह्याद्री फार्म्सचे संचालक अझहर तंबुवाला, डॉ. मनिषा रौंदळ आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.