esakal | नाशिकची सई ‘नासा’ची सिटिझन सायंटिस्‍ट! सहा लघुग्रह शोधताना भरीव कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

sai joshi

नाशिकची सई ‘नासा’ची सिटिझन सायंटिस्‍ट!

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : गेल्‍या महिन्‍यात लघुग्रहांच्या संशोधनासाठी अमेरिकेतील ‘नासा’तर्फे सिटिझन सायंटिस्ट प्रोजेक्ट घेण्यात आला. देशभरातील विद्यार्थ्यांनी या स्‍पर्धेत सहभाग नोंदविला. नाशिकच्या सई जोशी हिने संशोधन करत सहा लघुग्रहांचा शोध लावला. तिच्या या यशस्वी कामगिरीची दखल नासाकडून घेतली असून, तिला लवकरच प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. (Sai-joshi-NASA-Citizen-Scientist-nashik-marathi-news)

लवकरच प्रमाणपत्र; टीमसोबत सहा लघुग्रह शोधताना भरीव कामगिरी

सईसोबत देशभरातील १४ विद्यार्थ्यांनी लघुग्रहांचे संशोधन करत सिटिझन सायंटिस्ट किताब पटकावला आहे. सिटिझन सायंटिस्ट प्रोजेक्ट स्पर्धा नासाकडून घेण्यात आली. या प्रकल्पाबद्दल सईला पुण्यातील ‘अस्ट्रोनेरा’ संस्थेकडून माहिती मिळाली. अस्ट्रोनेरा ही संस्था खगोलशास्त्राचा प्रसार करते. महिनाभराच्या या प्रकल्‍पात सुरवातीचे पाच दिवस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. फरिदाबाद येथील ‘अस्ट्रोफनेटिक्स’ या संस्थेने हे प्रशिक्षण दिले. याअंतर्गत वेधशाळेकडून आलेल्या डेटा सेटचा एका सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास केला. हे इमेज सेट अमेरिकेतील हवाई राज्यातल्या ‘पॅन स्टार्स १’ या वेधशाळेकडून घेतले गेले होते. तसेच त्याच्यावर प्रक्रिया नासाने केली होती. भारतामधील १४ जणांच्या संघातील प्रत्‍येकाने महिनाभर एकूण सात इमेज सेट्सचा अभ्यास केला. सुमारे ५० संभाव्य लघुग्रहांची यादी आयएएससी या नासा संस्थेच्या एका उपसंस्थेला दिली. पुढील टप्प्‍यात नासा व पॅन स्टार्स वेधशाळेने या संभाव्य लघुग्रहांचा अभ्यास केला. त्‍यात त्यापैकी सहा नवीन लघुग्रहांचे संशोधन निश्चित केले. सई जोशी आणि तिच्‍या संघाने केलेले संशोधन आता नासा आणि हवाईमधील वेधशाळेने अधिकृतपणे ओळखले आहे. तसेच हे सर्व लघुग्रह नासाने ‘प्रिलिमिनरी प्रकारचे संशोधन’ म्हणून घोषित केले आहेत. पुढील सहा-दहा वर्षे नासामधील शास्त्रज्ञ या लघुग्रहांची कक्षा, त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यांची रचना अशा अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करतील. तसेच संशोधन करणारे सर्व १४ सदस्‍य आता नासाचे सिटिझन सायंटिस्‍ट ठरले आहेत.

गेल्या आठ-नऊ वर्षांपासून हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास करते आहे. पुढे खगोलशास्त्रातच करिअर करायचे असल्याने ही संधी अतिशय महत्त्वाची होती. नासासोबत जोडले गेल्‍याचा अभिमान वाटतो. -सई जोशी, संशोधक विद्यार्थिनी

हेही वाचा: भुजबळांच्या चिमट्यांनी भाजप नेत्यांना ठसके!

हेही वाचा: पंधरा शस्त्रक्रिया होऊनही जिद्दी शिक्षिकेने दिले कॅन्सरलाच आव्हान..!

loading image