SAKAL Exclusive : कसमादे मधील समृद्ध ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित; पुरातत्त्वची डोळेझाक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhodap Fort, Galna Fort, Devlikarad Temple

SAKAL Exclusive : कसमादे मधील समृद्ध ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित; पुरातत्त्वची डोळेझाक!

कळवण (जि. नाशिक) : इतिहासाच्या पाऊलखुणा जोपासणारे किल्ले आणि अध्यात्मिकतेचा वसा दर्शविणारे पुरातन हेमांडपंथी मंदिरे यामुळे कसमादे परिसराला ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. मात्र पुरातत्त्व विभाग आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे इतिहासाचा हा समृद्ध ठेवा अडगळीत पडला असून कसमादेतील पुरातन वास्तूंना गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज असून किल्ले, मंदिरे यासह पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. (SAKAL Exclusive Archeology department Ignore rich historical heritage in Kasmade Nashik news)

कसमादे परिसरात इतिहासाची साक्ष देत उभे असलेले गडदुर्ग आहेत. धोडप, कन्हेरगड, रवळ्या -जवळ्या, बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेर, मालेगाव तालुक्यातील गाळणा, मालेगावचा भुईकोट किल्ला असे अनेक ऐतिहासिक दृट्या महत्त्व असलेले किल्ले दुर्लक्षित आहेत. किल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून शिलालेख, विहिरी, गुहा, पाण्याचे टाके, दरवाजे, बुरूज या सर्वच गोष्टींकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

किल्ल्यांसोबतच पुरातन हेमांडपंथी मंदिरे देखील परिसरात असून प्राचीन मंदिरांचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज असून पुरातत्त्व विभागासह शासनाच्या पर्यटन विभागाने या वास्तूंचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

पर्यटन विकासाबाबत उदासीनताच

कसमादेत ऐतिहासिक किल्ले, हेमांडपंथी मंदिरे, मोठी धरणे यासह निसर्गरम्य परिसर, डोंगर-दऱ्या असल्याने या परिसरात पर्यटनाला मोठा वाव असला तरी पर्यटन विकासाबाबत ठोस संकल्पना नसल्याने व उदासीनतेमुळे पर्यटन विकास हे सध्या तरी स्वप्नचं आहे.

"कळवणसह बागलाण, मालेगाव, देवळा तालुक्याला ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लागला असल्यामुळे या भागातील गड, किल्ले, प्राचीन धर्मस्थळे यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्याचे जतन करावे, पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकसित करावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण शासनस्तरावर पत्रव्यवहार केला आहे.शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरु आहे." - आमदार नितीन पवार

"पर्यटन विकासाबाबतीत शासन आणि राज्यकर्त्यांची उदासीनता ही पर्यटन व ऐतिहासिक वस्तूंच्या दुर्लक्षास कारणीभूत ठरत आहे. इतर राज्ये पर्यटन विकासावर भर देत असताना वैभवशाली इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रात मात्र पर्यटन विकासाबाबत ठोस धोरण नसणे हे दुर्दैव आहे. पर्यटन विकासातून ऐतिहासिक वारसा जोपासला जाईल."
- दीपक हिरे, अध्यक्ष, कळवण तालुका स्वराज्य प्रतिष्ठान

"कळवण तालुक्यात चार ते पाच ऐतिहासिक किल्ले आहेत. सर्वच किल्ल्यांवरील ऐतिहासिक ठेवा ढासळतो आहे. किल्ले हे स्फूर्तिस्थान असून त्यांच्या पराक्रमी इतिहासामुळे प्रेरणा मिळत असल्याने किल्ल्यांना गतवैभव प्राप्त होण्याची गरज आहे." - स्मितेश कासार, पर्यटक